मुंबई : नवोदित क्रीडा मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात जयभारत क्रीडा मंडळ संघाने विजय क्लब संघाचे कडवे आव्हान ३८-३२ असे संपुष्टात आणत जेतेपद पटकावले. जय भारतचा अनिकेत मिटके या गटातील सर्वोत्तम अष्टपैलू कबड्डीपटू ठरला.श्रमिक जिमखान्यावर आयोजित केलेल्या या स्पर्धेत जयभारत संघाने लढतीत आधीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले होते. अनिकेत मिटके आणि सिद्धेश सावंतच्या चढायांनी विजय क्लबचा बचाव भेदण्यात यश मिळवले .
त्यामुळेच विजयी जय भारत संघाला मध्यंतरालाच २१-१९ अशी दोन गुणांची आघाडी मिळाली होती. पण, विजय क्लबचे चढाईपटू कार्तिक मिश्रा आणि राज नाटेकर यांनी जय भारत संघाला एकेक गुणांसाठी संघर्ष करायला लावला. जयभारत संघाच्या ओमकार मोरेच्या ताकदीचा खेळही अतिशय बहारदार झाला. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.त्यापूर्वी, या गटातील उपांत्य लढतीत विजय क्लबने अमर क्रीडा मंडळाचे आव्हान ३०-२६ असे संपुष्टात आणले. तर, जय भारतने बंडय़ा मारुती संघाला ३०-१३ असे नमवले.