Sania-Shoaib Divorce :भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा आता पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. गेल्या वर्षापासून हे सेलिब्रिटी कपल विभक्त होणार अशा बातम्या येत होत्या. मात्र आता शोएब मलिकने सोशल मीडियावरुन काही संकेत दिले आहेत ज्यामुळे या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दोघांचा २०१० मध्ये प्रेमविवाह झाला होता. हैदराबाद या ठिकाणी कुटुंबाच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. आता या दोघांचं नातं संपुष्टात येणार अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
डिसेंबर महिन्यातही सुरु होती या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा
काही महिन्यांपूर्वी जेव्हा या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली होती तेव्हा दर मिर्झा मलिक शो या पाकिस्तानच्या रिअॅलिटी शोमध्ये हे दोघं एकत्र दिसले होते. त्यानंतर या चर्चा थांबल्या होत्या. तसंच त्यावेळी ज्या चर्चा सुरु झाल्या त्यानंतर शोएब मलिक आणि सानिया यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे कारण शोएब मलिकने सोशल मीडियावर तसे संकेत दिले आहेत.
शोएब मलिकने इंस्टाग्राम बायोत केला बदल
शोएब मलिकने त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये बदल केला आहे. त्यामुळेच या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आलं आहे. @mirzasanar सुपरवुमनचा (सानिया मिर्झाचे इंस्टाग्राम अकाऊंट) पती, एक पिता असं शोएब मलिकने इंस्टाग्राम बायोमध्ये ठेवलं होतं. पण आता शोएबने त्याचा इंस्टा बायो बदलला आहे. तिथे आता एक पिता इतकंच त्याने ठेवलं आहे आणि सानिया मिर्झाचं नाव काढून टाकलं आहे. शोएबने हा बायो बदलल्यामुळेच हे दोघं विभक्त होणार आहेत अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
शोएब मलिकचं अफेअर?
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकचं अफेअर पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा उमरसह आहे आणि त्याने सानियाला फसवलं आहे अशाही चर्चा रंगल्या होत्या. शोएब आणि आयेशा यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र याविषयी विचारलं असता हे फोटो एका जाहिरातीचे आहेत असं स्पष्टीकरण आयेशाने दिलं होतं.