वृत्तसंस्था, कोलकाता : Tata Steel Chess Tournament भारताच्या दिव्या देशमुखने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला गटातील जलद विभागाचे शनिवारी जेतेपद पटकावले. तिने नऊ फेऱ्यांमध्ये सात गुण कमावले. चीनच्या जगज्जेत्या जु वेन्जूनला ६.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या दिव्याला या स्पर्धेत सुरुवातीला स्थानही मिळाले नव्हते. मात्र, आर. वैशालीने माघार घेतल्यानंतर १७ वर्षीय राष्ट्रीय विजेत्या दिव्याला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आणि तिने या संधीचे सोने केले. पहिल्या दोन दिवशी चमकदार कामगिरी करताना सहा फेऱ्यांअंती दिव्याने ५.५ गुणांसह अग्रस्थान भक्कम केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी, स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या सातव्या फेरीच्या लढतीत दिव्याला युक्रेनची ग्रँडमास्टर अ‍ॅना युशेनिनाने बरोबरीत रोखले. तर आठव्या फेरीत तिला पोलिना शुवालोवाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अखेरच्या फेरीपूर्वी वेन्जून आणि दिव्याचे समान सहा गुण झाले होते. मात्र, वेन्जून अव्वल स्थानावर होती. त्यामुळे दिव्याला अखेरच्या फेरीत विजय अनिवार्य होता. या फेरीत तिने काळय़ा मोहऱ्यांनी खेळताना भारताची अव्वल महिला बुद्धिबळपटू असलेल्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला नमवण्याची किमया साधली. दुसरीकडे वेन्जूनला युशेनिनाने बरोबरीत रोखल्याने दिव्याच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. शुवालोवा ५.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली.