विजेंदर सिंग, शिवा थापा, अखिल कुमार यांसारख्या अनेक स्टार बॉक्सर्सच्या अनुपस्थितीत रंगलेल्या आणि बॉक्सिंग इंडियाच्या विद्यमाने आयोजित पहिल्यावहिल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत ऑलिम्पियन दिवाकर प्रसादला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. लंडन ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या सुमीत संगवानने बलाढय़ प्रतिस्पध्र्यासमोर अनुभव पणाला लावत बाजी मारली. राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या रेल्वेच्या अमनदीप सिंगने सुरेख खेळाचे प्रदर्शन करत उपांत्य फेरी गाठली.
भारतीय बॉक्सिंगवर असलेल्या ऑलिम्पिक बंदीमुळे गेली दोन वर्षे देशातील बॉक्सिंग स्पर्धाना ‘ब्रेक’ लागला होता. पण नवी संघटना म्हणून उदयास आलेल्या बॉक्सिंग इंडियाने नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या पुरुषांच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने अनेक थरारक लढतींचा आस्वाद नागपूरकरांना घेता आला. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या दिवाकर प्रसादला भारताचा स्टार बॉक्सर शिवा थापाचा मोठा भाऊ गोविंदने हरवले. गोविंदचा सरळ पंच थेट हनुवटीवर बसल्यामुळे दिवाकरच्या चेहऱ्यातून रक्त येऊ लागले. त्यामुळे पंचांनी लढत थांबवून गोविंदला विजयी घोषित केले.
हरयाणाच्या सुमीत संगवानसमोर रेल्वेच्या कुलदीप सिंगचे तगडे आव्हान होते. पण सुमीतने योग्य दिशेने आत्मविश्वासाने पंचेस लगावत उपांत्यपूर्व फेरीची लढत २-१ अशी जिंकली.
अमनदीप सिंगने ५२ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंडच्या कविंदर सिंगचा २-१ असा पराभव केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा