पॅरिस : सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पायाच्या दुखापतीने त्रस्त झालेल्या स्पेनच्या कार्लोस अल्कराझचा ६-३, ५-७, ६-१, ६-१ असा पराभव करून सातव्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. वयाच्या ३६व्या वर्षी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा जोकोव्हिच १९२५ पासून केवळ दुसराच टेनिसपटू ठरला.
जोकोव्हिचने पहिल्या सेटपासून आपल्या खेळातील आक्रमकता दाखवली. पहिला सेट जोकोव्हिचने अगदी सहज जिंकला. पण, जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या अल्कराझने दुसऱ्या सेटमध्ये कमालीची लढाऊ वृत्ती दाखवत अगदी अखेरच्या क्षणी दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या सेटपासून अल्कारझला पायात वेदना जाणवू लागल्या. त्याच्या हालचाली आणि फटक्यातील वेग मंदावला होता. याचा फायदा घेत जोकोव्हिचने तिसरा आणि चौथा सेट अगदी सहज जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले.
कारकीर्दीत जोकोव्हिच आणि अल्कारझ दुसऱ्यांदाच, तर ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रथमच समोरासमोर आले होते. जोकोव्हिचला आता ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे ऐतिहासिक विजेतेपद निश्चितपणे खुणावत असेल. आतापर्यंत त्याने २२ ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवली आहे.
‘‘इतक्या सर्वोच्च स्तरावर खेळताना तंदुरुस्ती राखणे सर्वात महत्त्वाचे असते. ग्रँडस्लॅमसारख्या स्पर्धेत अखेरच्या टप्प्यात खेळताना पायात पेटके येणे खरेच दुर्दैवी आहे. मला आशा आहे तो लवकर बरा होईल. महत्त्वाच्या स्पर्धेत निर्णायक क्षणातून माघार घेण्याचा निर्णय घेणे खूप कठीण असते. अशा वेळी अल्कराझने दाखवलेली लढण्याची जिद्द कमाल होती,’’ अशा शब्दात जोकोव्हिचने अल्कराझच्या खेळाचे कौतुक केले.