ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचचे पुढील लक्ष्य आहे फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद. लाल मातीवरच्या रणसंग्रामाचे जेतेपद पटकावत कारकीर्दीत ग्रँडस्लॅम जेतेपदांचे वर्तुळ पूर्ण करण्याचा जोकोव्हिचचा इरादा आहे. २५व्या वर्षी सहा ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर असणाऱ्या जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेला माहेरघर बनवले आहे. सलग तिसऱ्या जेतेपदाचा आनंद साजरा करण्याऐवजी जोकोव्हिचला वेध लागलेत ते मे महिन्यात होणाऱ्या फ्रेंच खुल्या स्पर्धेचे.
फ्रेंच खुल्या स्पर्धेत गेल्यावर्षी जोकोव्हिचने अंतिम फेरी गाठली होती. परंतु लाल मातीचा बादशाह असलेल्या नदालने त्याचे जेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. ‘यंदा मला या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरायचे आहे. गेल्यावर्षी अंतिम फेरीत मी धडक मारली होती. नदालविरुद्धच्या चुरशीच्या मुकाबल्यात मला पराभवाला सामोरे जावे लागले. क्ले कोर्टवर नदालच जेतेपदाचा दावेदार असतो.
क्ले कोर्टवर त्याला नमवणे यासारखी दुसरी गोष्ट नाही’, असे शब्दांत जोकोव्हिचने आपल्या भावना व्यक्त केल्या. मी सातत्याने चांगले प्रदर्शन केले, शारीरिकदृष्टय़ा मी तंदुरुस्त असेन तर फ्रेंच खुल्या स्पर्धेत मला जेतेपद मिळवण्याची नक्कीच संधी असेल असे त्याने पुढे सांगितले.

Story img Loader