वृत्तसंस्था, विम्बल्डन : कार्लोस अल्कराझच्या खेळात रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि माझ्या खेळातील छटा आहेत, अशा शब्दांत नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन स्पर्धेतील नवविजेत्या अल्कराझची स्तुती केली. अग्रमानांकित स्पेनच्या २० वर्षीय अल्कराझने रविवारी पाच सेटच्या संघर्षपूर्ण लढतीत जोकोविचला पराभवाचा धक्का देत कारकीर्दीत प्रथमच विम्बल्डनचे जेतेपद पटकावले. यासह त्याने २३ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचची विम्बल्डनमधील मक्तेदारीही संपुष्टात आणली. जोकोविच सलग चार वेळा विम्बल्डनचा विजेता ठरला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्पर्धेत सलग ३४ सामने, तर सेंटर कोर्टवर ४५ सामने तो अपराजित होता. मात्र, अल्कराझने जोकोविचवर १-६, ७-६ (८-६), ६-१, ३-६, ६-४ असा विजय मिळवत कारकीर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जोकोविचने अल्कराझचे भरभरून कौतुक केले. त्याने अल्कराझच्या खेळाची फेडरर, नदाल आणि स्वत:च्या खेळाशी तुलना केली. फेडरर, नदाल आणि जोकोविच हे टेनिस इतिहासातील सर्वोत्कृष्ट तीन खेळाडू मानले जातात. 

‘‘अल्कराझच्या खेळात रॉजर, राफा आणि माझ्या खेळाची छटा आहे, असे लोक गेल्या वर्षभरापासून म्हणत आहेत. मलाही ते पटले आहे. त्याने आम्हा तिघांतील सर्वोत्तम गुण घेतले आहेत. मी त्याच्यासारख्या खेळाडूविरुद्ध यापूर्वी खेळलेलो नाही. कमी वयात त्याची मानसिकता वाखाणण्याजोगी आहे. रॉजर आणि राफा यांची महानता सर्वानाच ठाऊक आहे. मात्र, अल्कराझ हा परिपूर्ण खेळाडू आहे. यशस्वी आणि प्रदीर्घ कारकीर्द घडवण्यासाठी विविध प्रकारच्या टेनिस कोर्टशी जुळवून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे असे मी मानतो. अल्कराझमध्ये ती क्षमता मला दिसते,’’ असे जोकोविच म्हणाला.

तसेच अंतिम लढतीत आपल्याला विजयाची संधी होती, पण मोक्याच्या क्षणी आपण सर्वोत्तम खेळ करण्यात कमी पडलो असे जोकोविचने मान्य केले. ‘‘मला दुसऱ्या सेटचा टायब्रेकर नक्कीच जिंकता आला असता. चौथ्या सेटच्या मध्यातही सामन्याचे पारडे माझ्याकडे झुकले होते. मला अल्कराझची सव्‍‌र्हिस तोडण्यात यश आले होते. मात्र, आज बरीच हवा असल्याने मला स्मॅशचा फटका मारण्यात अडचण येत होती. अखेरीस मला याचा फटका बसला. सामना गमावल्याची खंत असली तरी अल्कराझला श्रेय मिळाले पाहिजे. त्याने प्रत्येक गुणासाठी लढा दिला आणि बचावाचे अप्रतिम तंत्र दाखवले. त्याने सामना जिंकणे हा योग्यच निकाल होता,’’ असेही जोकोविचने नमूद केले.

अल्कराझ अव्वलच; वोन्ड्रोउसोवा दहावी

विम्बल्डनमधील यशाचा अल्कराझ आणि मार्केटा वोन्ड्रोउसोवा यांना जागतिक क्रमवारीतही फायदा झाला आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या जोकोविचला अंतिम फेरीत नमवत अल्कराझने पुरुषांमध्ये आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले आहे. दुसरीकडे कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवल्यानंतर चेक प्रजासत्ताकच्या वोन्ड्रोउसोवाने अव्वल १० महिला खेळाडूंमध्ये प्रवेश मिळवला आहे. तिने कारकीर्दीतील सर्वोत्तम दहावे स्थान मिळवले आहे. २४ वर्षीय वोन्ड्रोउसोवाने इतिहास रचताना विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी पहिली बिगरमानांकित महिला खेळाडू होण्याचा मान मिळवला.

नोव्हाकसारख्या खेळाडूविरुद्ध अंतिम लढतीत खेळणे हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. मी त्याचे अभिनंदन करू इच्छितो. मी त्याच्याविषयी काय बोलणार? मी कायमच त्याच्याकडून प्रेरणा घेतली आहे. त्याला खेळताना पाहून मी टेनिस खेळण्यास सुरुवात केली. मी जन्मलो, त्याच्याही आधीपासून नोव्हाक विविध स्पर्धा जिंकत आहे. – कार्लोस अल्कराझ

दोन दशकांत पहिलाच अल्कराझमुळे २००२ सालानंतर प्रथमच जोकोविच, फेडरर, नदाल आणि अँडी मरे यांच्या व्यतिरिक्त विम्बल्डनला नवा विजेता मिळाला. फेडररने २००३ ते २००७, २००९, २०१२ व २०१७ असे आठ वेळा विम्बल्डनचे जेतेपद मिळवले. जोकोविच २०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९, २०२१, २०२२ असे सात वेळा विम्बल्डनचा विजेता ठरला. नदाल (२००८, २०१०) आणि मरे (२०१३, २०१६) यांनी प्रत्येकी दोन वेळा जेतेपद मिळवले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Djokovic praises wimbledon winner alcaraz is the best ysh
Show comments