नोवाक जोकाव्हिच, सेरेना विल्यम्स व अँडी मरे यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. मात्र अॅना इव्हानोविक व समंथा स्टोसूर या अनुभवी खेळाडूंना पराभवाचा धक्का बसला.
ग्रँड स्लॅम स्पर्धेत रौप्यमहोत्सवी विजय नोंदविताना जोकोवीच याने फ्रान्सच्या पॉल हेन्री मथेयु याचा ६-१, ६-३, ६-० असा धुव्वा उडवताना आपले अव्वल मानांकन सार्थ ठरविले. त्याने तेरा वेळा बिनतोड सव्र्हिस केल्या व ३३ वेळा बिनतोड फटके मारीत एकतर्फी विजय मिळविला. त्याला पुढच्या फेरीत स्थानिक खेळाडू सॅम क्युएरी याच्याशी खेळावे लागणार आहे.
सामना संपल्यानंतर जोकाव्हिच म्हणाला, वाऱ्याचा खूप त्रास होत होता त्यामुळे आम्हा दोघांनाही खेळताना नाकीनऊ आले तरीही मी परतीचे फटके व सव्र्हिसवर नियंत्रण ठेवू शकलो. अपेक्षेपेक्षा माझ्या सव्र्हिस खूपच अचूक झाल्या. या सामन्यातील सहज विजयामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे.
महिलांमध्ये जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू सेरेना हिने येथे विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याच्या दिशेने आव्हान राखले. तिने आपलीच सहकारी व्हॅनिसा किंग हिचा ६-१, ६-० असा दणदणीत पराभव केला. तिने या लढतीत सहा वेळा सव्र्हिस ब्रेक मिळविला. आर्थर अॅश स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात तिने केवळ ५६ मिनिटांत सामना जिंकला. तिला आता वार्वरा लेपचेन्को हिच्याशी झुंजावे लागणार आहे.
आठव्या मानांकित मरे याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या मथायस बचिंगर या जर्मन खेळाडूला ६-३, ६-३, ६-४ असे हरविले. पहिल्या फेरीत मरे याच्या पायात गोळा आला होता, मात्र दुसऱ्या फेरीत मथायसविरुद्ध त्याला कोणताही त्रास झाला नाही. मरे याने दोन वर्षांपूर्वी येथे विजेतेपद मिळविले होते. कॅनडाच्या मिलोस राओनिक याला जर्मनीच्या पीटर गोजोविज्क याच्याविरुद्ध विजय मिळवताना झुंजावे लागले. पाचव्या मानांकित राओनिक याने हा सामना ७-६ (७-४), ५-७, ६-४, ७-६ (७-३) असा जिंकला. त्याने या लढतीत २६ वेळा अचूक सव्र्हिस केल्या तसेच ६४ वेळा त्याने बिनतोड फटके मारले. तेरावा मानांकित जॉन इस्नेर याने जर्मनीच्या जॉन लेनार्ड स्ट्रफ याचा ७-६ (७-५), ६-४, ६-२ असा पराभव केला. क्युएरीने स्पेनच्या गुलिर्मो लोपेझ याचा ६-३, ६-४, ६-४ असा सरळ तीन सेट्समध्ये पराभव केला. क्युएरी याचा लोपेझवर हा सलग चौथा विजय आहे. ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षीय खेळाडू निक किगरेयस याने इटलीच्या आंद्रेस सेपी याच्यावर ६-४, ७-६ (७-२), ६-४ असा अनपेक्षित विजय नोंदविला. यंदा विम्बल्डनमध्ये त्याने रॅफेल नदाल याला पराभवाचा धक्का दिला होता. निको याच्यापुढे स्पेनच्या टॉमी रॉब्रेडो याचे आव्हान असेल. रॉब्रेडो याने इटलीच्या सिमोन बोलेल्ली याच्यावर मात केली. उत्कंठापूर्ण झालेला हा सामना त्याने ५-७, ६-७ (५-७), ६-४, ६-३, ६-२ असाजिंकला.
आठव्या मानांकित अॅना इव्हानोविक हिला चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवा हिने दुसऱ्याच फेरीत गारद केले. तिने हा सामना ७-५, ६-४ असा जिंकला. इव्हानोविक हिने खूप चुका करीत पराभव ओढवून घेतला. येथे २०११ मध्ये अजिंक्यपद मिळविणाऱ्या स्टोसूर हिला चुरशीच्या लढतीनंतर हार स्वीकारावी लागली. इस्तोनियाच्या काया कानेपी हिने तिला ३-६, ६-३, ७-६ (१०-८) असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले. मात्र आठव्या मानांकित पेत्रा क्विटोवा हिने अपराजित्व राखले. तिने चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा सितकोवस्का हिला ६-४, ६-२ असे हरविले.
अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोवीच, सेरेना, मरे यांची आगेकूच
नोवाक जोकाव्हिच, सेरेना विल्यम्स व अँडी मरे यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. मात्र अॅना इव्हानोविक व समंथा स्टोसूर या अनुभवी खेळाडूंना पराभवाचा धक्का बसला.
First published on: 30-08-2014 at 01:09 IST
TOPICSयूएस ओपन
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Djokovic serena murray sail through in us open