विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकसाठी उत्सुक असलेला नोव्हाक जोकोव्हिच व अव्वल खेळाडू मारिया शारापोव्हा यांनी दमदार सलामी देत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत शानदार सुरुवात केली. भारताच्या सोमदेव देववर्मन यानेही विजयी सलामी दिली.
जोकोव्हिचने फ्रान्सच्या पॉल हेन्री मॅथ्यू याच्यावर ६-२, ६-४, ७-५ असा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळविला. जोकोव्हिचने गतवर्षी येथील अंतिम लढतीत राफेल नदाल याला पाच तास ५३ मिनिटांच्या लढतीनंतर पराभूत केले होते.
शारापोव्हाने झंझावती खेळ करीत ओल्गा पुचकोव्हा हिचा ६-०, ६-० असा ५५ मिनिटांमध्ये धुव्वा उडविला. सेंटर कोर्टवर झालेल्या या लढतीत शारापोव्हाने आक्रमक खेळाचा प्रत्यय घडविला. व्हीनस विल्यम्सने एक तासाच्या खेळात गॅलिना व्होस्कोबोवा हिच्यावर ६-१, ६-० असा दणदणीत विजय मिळविला. चौथ्या मानांकित अग्निस्झेका रॅडव्हान्स्का हिने ऑस्ट्रेलियाच्या बोजाना बोबूसिक हिला ७-५, ६-० असे पराभूत केले. २०११मध्ये अमेरिकन स्पर्धा जिंकणाऱ्या समंथा स्टोसूरने तैवानच्या चांग केईचेन हिचा ७-६ (७ /३), ६-३ असा पराभव केला. माजी उपविजेती ली ना हिने झकास सलामी देताना कझाकिस्तानच्या सेसिल कारतान्चेवा हिला ६-१, ६-३ असे नमविले. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल मानांकित येलेना यान्कोवीच हिने स्वीडनच्या जोहाना लार्सन हिचे आव्हान ६-२, ६-२ असे संपुष्टात आणले. पुरुषांमध्ये, थॉमस बर्डीच याने आव्हान राखताना मायकेल रसेल याच्यावर ६-३, ७-५, ६-३ अशी मात केली, तर दहाव्या मानांकित निकोलस अल्माग्रो याने अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सन याच्यावर ७-५, ६-७ (४-७), ६-२, ६-७ (६-८), ६-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.
भारताच्या सोमदेव देववर्मन याने पहिल्या फेरीत बियोर्न फाऊ याच्यावर ६-३, ६-२, ६-३ अशी मात केली. सोमदेवने परतीच्या खणखणीत फटक्यांचा बहारदार खेळ केला तसेच त्याने नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. विजय मिळविल्यानंतर सोमदेव म्हणाला, ‘‘भारतीय टेनिस संघटनेतील पदाधिकाऱ्यांबरोबर झालेले मतभेद माझ्या पथ्यावरच पडले आहेत. कारण त्यामुळे आम्ही सर्व खेळाडू बऱ्याच दिवसांनंतर एका समान ध्येयाकरिता एकत्र आलो आहोत. आमची एकत्रित ताकद ही मला येथे आत्मविश्वास उंचावण्यासाठी उपयोगी पडली आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा