जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोव्हिच, सर्बियाची जेलिना जान्कोव्हिक आणि ऑस्ट्रेलियाची संमथा स्टोसूर यांनी दुसऱ्या फेरीत सहज विजय मिळवत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आगेकूच केली. चीनच्या ली ना हिला मात्र दुसऱ्याच फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
सर्बियाच्या अव्वल मानांकित जोकोव्हिचने अर्जेटिनाच्या गुइडो पेला याचा ६-२, ६-०, ६-२ असा सहज पराभव केला. पुढील फेरीत जोकोव्हिचची गाठ पडेल ती ग्रिगोर दिमिट्रोव्ह याच्याशी. दिमिट्रोव्हने फ्रान्सच्या लुकास पोईली याचा ६-१, ७-६(४), ६-१ असा पराभव केला. जपानच्या केई निशिकोरीने स्लोव्हाकियाच्या ग्रेगा झेम्लिया याच्यावर ६-१, ५-७, ६-१, ६-४ अशी मात केली.
पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात अमेरिकेच्या बेथानी मट्टेक-सँड्स हिने ली ना हिचे आव्हान ५-७, ६-३, ६-२ असे संपुष्टात आणले. २०११मध्ये जेतेपद पटकावणाऱ्या ली ना हिला सात वर्षांत पहिल्यांदाच इतक्या लवकर पराभवाचा सामना करावा लागला. बेथानी हिची तिसऱ्या फेरीतील लढत अर्जेटिनाच्या पावला ओर्माचिया हिच्याशी होईल. जान्कोव्हिकने आपल्या प्रतिष्ठेला साजेसा खेळ करीत सलग १२ गेम्स जिंकले आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेत तिने स्पेनच्या गार्बिन मुगुरूझाला सहज पराभूत करण्याची किमया साधली.
प्रारंभी जान्कोव्हिक पिछाडीवर पडली होती. परंतु नंतर तिने झंझावाती खेळ केला आणि ६-३, ६-० अशा फरकाने मुगुरूझाचा पराभव केला. स्टोसूरने आपला दुसऱ्या फेरीचा सामना पूर्ण करताना क्रिस्तिना म्लाडेनोव्हिकचा ६-४, ६-३ असा पराभव केला. आता तिसऱ्या फेरीत जान्कोव्हिकचा स्टोसूरशी सामना होणार आहे. याचप्रमाणे झेंग जीने अमेरिकेच्या मीलाने ओडिनचा ६-३, ६-१ असा पराभव केला.

Story img Loader