नोव्हाक जोकोव्हिचने सुरेख खेळाचे प्रदर्शन करून एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेतील रॉजर फेडररची मक्तेदारी अखेर संपुष्टात आणली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोव्हिचने फेडररचा ७-६ (८/६), ७-५ असा पराभव करून एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली.
दोन तास १४ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सहा वेळच्या विजेत्या फेडररचा पराभव करून जोकोव्हिचने सलग दुसऱ्या वर्षी मोसमाअखेरीस अव्वल स्थानी राहण्याची किमया केली. २५ वर्षीय फेडररने शानदार खेळाचे प्रदर्शन करून दुसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यापूर्वी २००८मध्ये त्याने शांघाय येथे ही स्पर्धा जिंकली होती. जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर पुढील तिन्ही ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये जोकोव्हिचला जेतेपदावर मोहोर उमटवता आली नाहीमात्र एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धाजिंंकून त्याने मोसमाची सांगता शानदार केली.
स्पर्धेच्या ४३ वर्षांच्या इतिहासात क्रमवारीतील दोन अव्वल खेळाडू अंतिम फेरीत एकत्र येण्याची ही चौथी वेळ होती. या दोघांनीही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केल्यामुळे चाहत्यांना सुरेख खेळाची पर्वणी अनुभवता आली.