भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर एन. श्रीनिवासन विराजमान झाले का, हे जाणून घेण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी प्रकर्षांने टाळले. याचप्रमाणे माझा पिच्छा पुरवण्याचे थांबा, अशा शब्दांत त्यांची कानउघाडणीही केली.
‘‘मी उत्तर देणार नाही, माझा अशा प्रकारे पिच्छा पुरवू नका,’’ असे श्रीनिवासन यांनी चेन्नईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना खडसावले. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे पायउतार झालेले अध्यक्ष श्रीनिवासन मंगळवारी बीसीसीआयचा आपला पदभार पुन्हा स्वीकारण्याची शक्यता होती. परंतु मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत कोणते निश्चितपणे कळू शकले नाही.
बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. याचप्रमाणे मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनीही याबाबतच्या घडामोडींची आपल्याला माहिती नसल्याचे कळवले आहे.
आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी द्विसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालात चेन्नई सुपर किंग्ज व गुरुनाथ मयप्पन यांच्याविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे श्रीनिवासन अध्यक्षपदावर परतण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. तथापि, मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयची द्विसदस्यीय समिती ‘अनधिकृत व घटनाबाह्य’ असल्याचा ठपका ठेवला. बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची बैठक २ ऑगस्टला होणार असून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषविणार, हा संभ्रम निर्माण झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा