आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकाराने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी व्यथित झाला आहे. खेळण्यासाठी पुरेसा पैसा मिळत असूनही खेळाडू भ्रष्टाचाराच्या प्रकरणात का अडकतात ते समजत नाही, असे मत आफ्रिदीने प्रकट केले आहे.
‘‘आपल्यासोबत खेळणारे खेळाडू तुरुंगात जात असल्याचे चित्र दु:खद आहे. सध्या जगभरात अनेक ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये खेळून खेळाडूंना व्यवस्थित पैसा मिळत असतानाही ते अशा अनैतिक गोष्टींत अडकत असल्याचे वाईट वाटते,’’ असे त्याने पुढे सांगितले. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, स्पॉट- फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या सलमान बट, मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ या त्रिकुटाच्या गैरप्रकारांबाबत आफ्रिदीनेच आयसीसीच्या लाचलुचपतविरोधी पथकाला सर्वप्रथम माहिती दिली होती.
याचप्रमाणे पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफने आयसीसीच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या प्रमुख देशांच्या कार्यपद्धतीची तपासणी करण्याची मागणी केली आहे. ‘‘क्रिकेटची विश्वासार्हता परत मिळवायची असेल तर आयसीसीने क्रिकेटशी संबंधित व्यक्ती तसेच संघटनांच्या चारित्र्य-तपासणीची वेळ आली आहे. आयसीसीच्या समित्यांमध्ये असणाऱ्या अनेक व्यक्तींचे सट्टेबाजीत पैसा गुंतवणाऱ्या मोठमोठय़ा उद्योगपतींशी लागेबांधे आहेत. त्यामुळे मी व्यथित आहे,’’ असे लतीफने सांगितले.