How money is generated for players and franchises in IPL : जगातील सर्वात प्रसिद्ध आणि महागडी टी-२० लीग म्हणून आयपीएलला ओळखल जातं. सर्वात मोठ्या श्रीमंत क्रिकेट बोर्डाची आयपीएल लीग यंदा २२ मार्च पासून सुरु होणार आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु यांच्यातील सामन्याने होत आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलने अवघ्या १६ वर्षात जगभरातील क्रीडा लीगला मागे टाकले आहे. या लीगदरम्यान, खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा पाऊस पाडला केला जातो. त्यामुळे जगभरातील क्रिकेटपटूंचे या लीगचा भाग व्हायचे स्वप्न असते.
आयपीएल २०२४ हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव आधीच झाला असून आता खेळाडू तयारीसाठी आपापल्या फ्रँचायझींच्या सराव मोहिमांमध्ये सामील होत आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या मनात हा प्रश्न वारंवार येतो की, एका खेळाडूवर करोडो रुपये खर्च करणाऱ्या फ्रँचायझींची आयपीएलमधून कमाई कशी होते? यासाठी आज आपण आयपीएलचे महसूल मॉडेल काय आणि कसे असते? ते जाणून घेऊयात.
आयपीएलच्या कमाईचा सर्वात मोठा स्त्रोत कोणता?
इंडियन प्रीमियर लीग बीसीसीआय द्वारे चालवली जाते, त्यामुळे बोर्ड आणि लीगच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत मीडिया आणि त्याचे प्रसारण हक्क आहे, जे ते चॅनेल आणि इतर माध्यम वापरकर्त्यांना बोली लावून विकतात. सुरुवातीला हे माध्यम हक्क आणि प्रसारण हक्क विकल्यानंतर मिळालेल्या पैशांपैकी २० टक्के रक्कम बीसीसीआयकडे जात असे, तर संघांना ८० टक्के मिळायचे, पण हळूहळू ही रक्कम ५०-५० झाली आहे. सध्या टीव्ही प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत तर डिजिटल प्रसारणाचे अधिकार जिओ सिनेमाकडे आहेत.
हेही वाचा – WPL 2024 : १७ मार्चला लिहिला जाणार नवा इतिहास, स्मृती मंधाना विराट कोहलीचे स्वप्न पूर्ण करणार?
आयपीएल संघांना कसा मिळतो पैसा?
मीडिया ब्रॉडकास्टिंग अधिकारांव्यतिरिक्त, आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या फ्रँचायझी अनेक जाहिरात मोहिमा आणि प्रायोजकत्वांमधून पैसे कमवतात, ज्या अंतर्गत ते सामन्यात खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंच्या जर्सीवरील जागा विकतात. यामध्ये अनेकदा खेळाडूंच्या टोप्या, जर्सी आणि हेल्मेटवर दिसणाऱ्या कंपन्यांची नावे वेगवेगळी असतात आणि तिथे त्यांचा लोगो वापरण्यासाठी कंपन्या खूप पैसे देतात. लीग दरम्यान, संघ या कंपन्यांसोबत त्यांच्या प्रमुख खेळाडूंच्या जाहिराती शूट करण्यासाठी खूप पैसे आकारतात.
आयपीएलमध्ये संघ तीन मार्गाने पैसे कमवतात –
सोप्या भाषेत सांगायचे तर आयपीएलमधील सर्व संघांची कमाई तीन भागांमध्ये विभागली गेली आहे, ज्याचा पहिला भाग केंद्रीय महसूल आहे. त्यात मीडिया प्रसारण अधिकार आणि शीर्षक प्रायोजकत्व समाविष्ट आहेत. संघ त्यांच्या एकूण कमाईपैकी ६० ते ७० टक्के केंद्रीय महसूल गोळा करतात. त्याचबरोबर कमाईपैकी २० ते ३० टक्के कमाई जाहिरातीतून मिळते. या व्यतिरिक्त, तिसरा भाग स्थानिक महसूल आहे, ज्यामध्ये तिकीट विक्रीसह इतर गोष्टींचा समावेश आहे आणि यातून फ्रँचायझी सुमारे १० टक्के कमावते.
हेही वाचा – ‘विराट-रोहित नव्हे तर ‘हा’ खेळाडू क्रिकेट जगतो आणि श्वास…’, रॉबिन उथप्पाने सांगितले नाव
एकूण कमाईत तिकीट विक्रीचाही मोठा वाटा –
कोरोनाच्या महामारीनंतर, आयपीएलमध्ये होम आणि अवे व्हेन्यूचे स्वरूप परत आले आहे, ज्यामुळे प्रत्येक संघ आपल्या घरच्या मैदानावर किमान ७ सामने खेळतो. यामुळे, प्रत्येक सामन्यातील तिकीट विक्रीतून मिळणारा सुमारे ८० टक्के महसूल फ्रँचायझी मालकांना जातो, तर २० टक्के हिस्सा बीसीसीआय आणि त्या राज्यातील असोसिएशनमध्ये विभागला जातो. फ्रँचायझींना तिकीट विक्रीतून भरपूर कमाई होते.