प्रत्येक संघातील खेळाडू हे आपल्या पाठीवर एक जर्सी नंबर घालून खेळत असतात. क्रिकेटच्या मैदानात १० क्रमांकाची जर्सी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने लोकप्रिय केली. १० क्रमांकाची जर्सी घालून त्याने क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम मोडीत काढले. नवे विक्रम प्रस्थापित केले. त्यानंतर १० नंबरची जर्सी म्हणजे संघातील सर्वोत्तम खेळाडू असा जणू एक संकेतच बनला. पण प्रत्यक्षात मात्र तेंडुलकरने केवळ त्याच्या अडणावातील टेन या शब्दावरून १० नंबरची जर्सी निवडली होती. पण काही लोक विचारपूर्वक आपल्या जर्सीचा नंबर निवडतात.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा वाढदिवस सात जुलै म्हणजेच सातव्या महिन्यात सातव्या दिवशी येतो त्यामुळे त्याने स्वत:च्या जर्सीचा नंबर ७ घेतला आहे. वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल या सुरूवातीला वेगळ्या क्रमांकाची जर्सी वापरायचा, पण त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३३३ धावांची खेळी केल्यापासून त्या त्रिशतकाचा अभिमान म्हणून त्याची जर्सी ३३३ नंबरची आहे. तसाच काहीसा किस्सा हार्दिक पांड्यासोबतचा आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा आधी मुंबई इंडियन्सकडून क्रिकेट खेळला. त्यात त्याची फटकेबाजी आणि खेळाची समज पाहून त्याला भारतीय संघात घेण्यात आले. मुंबई इंडियन्स आणि टीम इंडिया अशा दोनही संघांसाठी हल्ली हार्दिक सारख्याच क्रमांकाची म्हणजे २२८ नंबरची जर्सी घालून खेळतो. त्यामागचे कारणदेखील तितकेच खास आहे. ICC ने हाच एक प्रश्न आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विचारला आहे.

काही वर्षांपूर्वी हार्दिक पांड्या वडोदरा (बडोदा) संघाकडून १६ वर्षाखालील क्रिकेट संघात खेळत होता. मुंबईविरूद्धच्या एका सामन्यात त्यांच्या संघाचे चार बळी अवघ्या ६० धावांत तंबूत परतले. त्यानंतर हार्दिक पांड्याने मैदानात येऊन तुफानी खेळी केली. त्याने केलेल्या द्विशतकाच्या जोरावर बडोदा संघाने सामना मोठ्या फरकाने जिंकला. त्या सामन्यात हार्दिकने २२८ धावांची खेळी केली होती, त्यामुळे त्याला त्या आकड्याबाबत आपुलकी वाटली. त्या तडाखेबाज विजयाची आठवण म्हणून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाकडून खेळताना २२८ नंबरची जर्सी परिधान करतो.