Dodda Ganesh questions BCCI over selection of KL Rahul as wicketkeeper for Test series : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. तसेच सेंच्युरियनमध्ये २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. केएल राहुल कसोटी मालिकेत यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडणार आहे. राहुलला यष्टिरक्षक बनवण्याच्या निर्णयाने भारताचा माजी गोलंदाज दोडा गणेश आश्चर्यचकित झाला आहे.
केएल राहुलने विश्वचषकातही केले होते यष्टीरक्षण –
केएल राहुलने विश्वचषकात यष्टिरक्षकाची भूमिकाही बजावली होती. संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी अनेक वेळा त्याच्या यष्टीरक्षणाचे कौतुक केले होते. मात्र, गणेशला वाटते की केएल राहुलबाबत हे योग्य नाही. त्याने याबाबत एक्सवर पोस्ट करत आपले मत व्यक्त केले आहे. दोडा गणेशने बीसीसीआयच्या निवड समितीने निवडलेल्या कसोटी संघावर प्रश्न उपस्थित केला आहे.
दोडा गणेशने कसोटी संघावर उपस्थित केला प्रश्न –
गणेशने कसोटी संघाबद्दल एक्सवर पोस्ट करताना लिहिले, “केएल राहुल कसोटीत विकेटकीपर म्हणून? जर तो सलामीवीर नसेल, तर त्याने किमान तिसऱ्या क्रमांकावर यायला हवे. यष्टीरक्षक असताना त्याला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल. यापेक्षा तो चांगला फलंदाज आहे. मला आशा आहे की काही शहाणपण येईल आणि केएल राहुलला फक्त एक फलंदाज म्हणून खेळण्याची संधी मिळेल.”
हेही वाचा – World Cup: विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवून बसलेल्या मिचेल मार्शचे बेताल वक्तव्य; म्हणाला, “मी पुन्हा तसेच…”
राहुल द्रविडच्या उपस्थितीत झाली तीन संघांची निवड –
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या उपस्थितीत गुरुवारी निवड समितीची बैठक झाली. तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे, तर त्यानंतर १७ डिसेंबरपासून जोहान्सबर्ग येथे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या तिन्ही मालिकेसाठी भारतीय संघा जाहीर करण्यात आला आहे. बी साई सुदर्शन आणि रिंकू सिंग यांना प्रथमच भारताच्या वनडे संघात स्थान मिळाले आहे.
हेही वाचा – “मी अद्याप करारावर…”, BCCIने कार्यकाळ वाढवण्याच्या घोषणेवर द्रविडचे बुचकळ्यात टाकणारे वक्तव्य
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसीध कृष्णा.