Dodda Ganesh: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू दोड्डा गणेश यांची केनिया पुरूष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी काही दिवसांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता अवघ्या महिन्याभरानंतर क्रिकेट केनियाने मोठा निर्णय घेत त्यांना या पदावरून हटवले आहे. माजी भारतीय वेगवान गोलंदाज दोड्डा गणेश गेल्या महिन्यात म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी केनिया क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. दोड्डा गणेश यांनी देशांतर्गत स्तरावर कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले आणि भारतासाठी चार कसोटी आणि एक वनडे सामना खेळले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Neeraj Chopra: अवघ्या एका सेंटीमीटरने हुकलं नीरज चोप्राचं जेतेपद, डायमंड लीग स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर मानावे लागले समाधान; पाहा VIDEO

३० दिवसांत माजी भारतीय क्रिकेटपटूची मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी

केनियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दोड्डा गणेश यांची नियुक्ती ही अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून लॅमेक ओन्यांगो यांच्या कार्यकाळानंतर झाली. दोड्डा गणेश यांच्या कोचिंग स्टाफमध्ये ओनयांगो, जोसेफ अंगारा आणि जोसेफ असिची यांचाही या समावेश होता. दोड्डा यांच्या नियुक्तीनंतर ते केनिया क्रिकेट संघाला नवी दिशा देतील, असे मानले जात होते. परंतु नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या ३० दिवसांनी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. Nation.Africa ने दिलेल्या वृत्तानुसार, दोड्डा गणेश यांना एक पत्र पाठवण्यात आले होते की कार्यकारी मंडळाने प्रस्थापित प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा – Yograj Singh: “माझ्या वडिलांनी वाघाची शिकार करून रक्त माझ्या ओठाला लावलं…”, युवीच्या बाबांनी सांगितला धक्कादायक किस्सा

दोड्डा गणेश यांना जे पत्र देण्यात आले त्यात म्हटले होते की, क्रिकेट केनियाच्या कार्यकारी मंडळाने बुधवार, २८ ऑगस्ट २०२४ रोजी पारित केलेल्या ठरावाच्या अनुषंगाने आणि क्रिकेट केनिया घटनेच्या अनुच्छेद ५.९ आणि ८.४.३ नुसार, आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की कार्यकारी मंडळाने पुरुष क्रिकेट राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून तुमची नियुक्ती मंजूर करण्यास नकार दिला आहे. ७ ऑगस्ट २०२४ रोजी श्री मनोज पटेल आणि तुमच्यामध्ये झालेला करार रद्द करण्यात आला आहे.’

हेही वाचा – Tilak Verma Century: तिलक वर्माच्या शतकाचं आवेश खानने केलं सॅमी स्टाईल सेलिब्रेशन, सूर्यकुमार यादव पोस्ट करत म्हणाला “बेस्ट बर्थडे गिफ्ट…”

क्रिकेट केनियाच्या महिला क्रिकेट संचालक पेर्लिन ओमामी यांनी बोर्डाच्या वतीने स्वाक्षरी केलेल्या पत्राद्वारे हा निर्णय घेण्यात आला. मात्र, दोड्डा गणेश यांना या पदावरून हटवण्यामागील नेमकी कारणे किंवा प्रक्रियात्मक उल्लंघन अद्याप समोर आलेले नाही. दोड्डा गणेश यांना पदावरून हटवल्यानंतर लॅमेक ओन्यांगो आणि जोसेफ अंगारा यांना अनुक्रमे अंतरिम मुख्य प्रशिक्षक आणि सहायक प्रशिक्षक नेमण्यात आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dodda ganesh removed from post of kenya mens cricket team head coach board said indias former cricketer appointment was carried out inappropriately bdg