India vs Australia 3rd ODI Viral Video : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय मालिकेचा अखेरचा सामना आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झाला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारताला २७० धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झॅम्पा आणि अॅश्टन एगरच्या फिरकीनुं भारताच्या सहा फलंदाजांना गुंडाळलं अन् विजयाच्या दिशेनं चाललेल्या भारताच्या रथाला रोखलं. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या भेदक माऱ्यापुढं भारताचा आख्खा संघ २४८ धावांवर गारद झाला.
त्यामुळं ऑस्ट्रेलियाने तिसरा एकदिवसीय सामना जिंकून २-१ ने आघाडी घेत मालिका खिशात घातली. दरम्यान, पहिल्या इनिंगमध्ये भारताची गोलंदाजी सुरु असताना ४३ व्या षटकात एक रोमांच पाहायला मिळाला. एक भटका कुत्रा थेट मैदानात घुसल्याने ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यात सुरु असलेला सामना काही काळ थांबवावा लागला. या कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
प्राण्यांचं लाईव्ह सामना सुरु असताना अशाप्रकारे मैदानात घुसणं नवीन गोष्ट नाहीय. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गतवर्षी झालेल्या एका सामन्यादरम्यान मैदानात चक्क सापच घुसला होता. गुवाहाटीत असलेला बारसपारा स्टेडियम जंगलाच्या जवळ असलेल्या शहरात आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सापांचा मुक्त संचार असणे, ही वेगळी गोष्ट नाहीय. पण त्यावेळी सापाला योग्यप्रकारे पकडण्यात आल्याने सुदैवाने कोणत्याच खेळाडूला दंश झाला नाही. दरम्यान आज झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने १७ चेंडूत ३० धावा केल्या. तर सलामीवीर फलंदाज शुबमनने ४९ चेंडूत ३७ धावांची खेळी साकारली.
पण हे दोघेही सलामीवीर फलंदाज तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने चौफेर फटकेबाजी करत महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. विराटसोबत के एल राहुलनेही धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. के एल राहुलने ५० चेंडूत ३२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियच्या एबॉटने रोहितला बाद केलं. तर अॅडम झॅम्पाच्या गोलंदाजीवर शुबमन गिल आणि के एल राहुल बाद झाला. विराट अर्धशतकी खेळी करून चांगल्या लयमध्ये खेळत होता. पण एगरच्या गोलंदाजीवर इन साईट आऊट मारताना विराटचा ५४ धावांवर वॉर्नरने झेल पकडला. त्यानंतर अक्षर पटेल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण त्यालाही धावांचा सूर गवसला नाही आणि तो अवघ्या २ धावांवर रनआऊट झाला. त्यानंतर मैदानात उतरलेला सूर्यकुमार पुन्हा एकदा शून्यावर बाद होऊन गोल्डन डक झाला. ७ नंबरवर फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्यकुमारला एगरने क्लीन बोल्ड केलं.