फिरकीपटू झेव्हियर डोहर्टी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा महत्त्वाचा घटक आहे. चेन्नई कसोटीतील दारुण पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघ डोहर्टीला अंतिम अकरात समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. मात्र त्याचवेळी डोहर्टी कसोटीचा खेळाडू नसल्याचे उद्गार माजी फिरकीपटू स्टुअर्ट मॅकगिलने काढले आहेत. विशेष म्हणजे मॅकगिल ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकी विशेषज्ञ म्हणून काम पाहत आहे. डोहर्टी हा कसोटीला योग्य गोलंदाज नाही. त्याला संघात घेतल्यास ऑस्ट्रेलियन संघावर बूमरँग उलटू शकते असे मॅकगिल पुढे म्हणतो.  
डोहर्टी एक गुणी खेळाडू आहे. मात्र कसोटी प्रकारासाठी त्याची गोलंदाजी उपयुक्त नाही. संघाच्या रचनेतला तो महत्त्वाचा घटक आहे. एकदिवसीय तसेच ट्वेन्टी-२० प्रकारात गेल्या तीन वर्षांतला संघातला तो सर्वोत्तम फिरकीपटू आहे. परंतु झटपट क्रिकेटमधील कामगिरीची तो कसोटीत पुनरावृत्ती करेल का याची शंका वाटते असे त्याने पुढे सांगितले.

Story img Loader