नवी दिल्ली : देशांतर्गत क्रिकेटच्या २०२३-२४च्या हंगामाला जूनमध्ये दुलीप करंडक स्पर्धेसह प्रारंभ होणार असून, प्रतिष्ठेची रणजी करंडक स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीपासून खेळवली जाईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रविवारी झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. दुलीप करंडक स्पर्धा २८ जूनपासून सुरू होईल, तर रणजी करंडकाला पुढील वर्षी ५ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.
पुरुषांच्या वरिष्ठ गटातील हंगामाची सांगता रणजी स्पर्धेने होईल. स्पर्धेतील एलिट विभागातील लढती ५ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होतील. बाद फेरीच्या लढती २३ फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान खेळवण्यात येतील. रणजी स्पर्धेचा एकूण कालावधी ७० दिवसांचा असेल. प्लेट विभागातील सामने ५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२४, तर बाद फेरीचे सामने ९ ते २२ फेब्रुवारी २०२४ दरम्यान होणार आहेत.
रचना नेहमीचीच
रणजी एलिट आणि प्लेट विभागाची रचना नेहमीचीच राहील. यामध्ये एलिट विभागात आठ संघांचे चार गट असतील. प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. प्लेट विभागात सहा संघांचा एकच गट असेल. यातील पहिले चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. प्लेट विभागातील अंतिम फेरी खेळणारे संघ पुढील हंगामासाठी एलिट विभागात जातील, तर एलिट विभागाच्या प्रत्येक गटातील तळाच्या दोन संघांची पुढील हंगामासाठी पदावनती प्लेट विभागात होईल.
महिला गटातील ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांसाठी आठ संघांचे दोन, तर सात संघांचे तीन असे पाच गट राहतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. साखळी सामन्यांनंतर महिला संघांना १ ते १० क्रमांकानुसार मानांकन देण्यात येईल. पहिले सहा संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळतील, तर ७ ते १० क्रमांकाचे संघ उपउपांत्यपूर्व फेरी खेळतील.
महिलांसाठी कायमस्वरूपी साहाय्यक
भारतीय महिला क्रिकेटपटूंना आता कायमस्वरूपी साहाय्यकांची निवड केली जाणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीने मुख्य प्रशिक्षकाची निवड केल्यावर फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची निवड राष्ट्रीय क्रिकेट अकादमी करणार आहे.
प्रक्षेपण हक्काबाबत निर्णय नाही
आंतरराष्ट्रीय आणि ‘आयपीएल’ सामन्यांच्या थेट प्रसारणाचे हक्क टीव्ही आणि डिजिटल अशा दोन आघाडय़ांवर घेण्यात आले. देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी असाच निर्णय विषय पत्रिकेवर होता. मात्र, त्याबाबत निर्णय झाला नाही.
असा असेल कार्यक्रम
’ दुलीप करंडक (सहा विभागीय संघात) : २८ जूनपासून
’ देवधर करंडक (प्रथम श्रेणी) : २४ जुलै ते ३ ऑगस्ट
’ इराणी करंडक : १ ते ५ ऑक्टोबर
’ मुश्ताक अली करंडक (ट्वेन्टी-२०) : १६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर
’ विजय हजारे करंडक (एकदिवसीय) : २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर
महिलांच्या स्पर्धा
’ राष्ट्रीय ट्वेन्टी-२० : १९ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर
’ आंतरविभागीय ट्वेन्टी-२० : २४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर
’ वरिष्ठ महिला एकदिवसीय : ४ ते २६ जानेवारी २०२४