खळबळजनक विजय आणि पर्यायाने धक्कादायक पराभवाचा सिलसिला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सोमवारी सुरुच राहिला. तृतीय मानांकित आणि जेतेपदासाठीच्या संभाव्य दावेदारांपैकी एक असलेल्या मारिया शारापोव्हाला सोमवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत गाशा गुंडाळावा लागला. स्लोव्हाकियाच्या २०व्या मानांकित डॉमिनिका सिबुलकोव्हाने शारापोव्हावर ३-६, ६-४, ६-१ असा सनसनाटी विजय मिळवला.
सेरेनाप्रमाणेच शारापोव्हाने देखील पराभवानंतर दुखापतीमुळे त्रस्त असल्याचे सांगितले. ‘नितंबाच्या दुखापतीमुळे हालचालींवर मर्यादा आली, मात्र हे पराभवाचे कारण नाही. सिबुलकोव्हाने चांगला खेळ करत विजय मिळवला. मी निश्चित पुनरागमन करेन’, असा विश्वास शारापोव्हाने व्यक्त केला. शारापोव्हाने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटच्या दरम्यान उपचारासाठी मेडिकल टाइम आऊट घेतला. मात्र दुखापतीची तीव्रता कमी झाली नाही. खांद्याच्या दुखापतीतून सावरत शारापोव्हाने ब्रिस्बेन खुल्या स्पर्धेत पुनरागमन केले होते. या स्पर्धेतले आतापर्यंतचे तिचे प्रदर्शन पाहता, ती या दुखापतीतून सावरली आहे असे वाटत होते. मात्र आणखी एक दुखापत बळावल्याने जेतेपदाचे स्वप्न चौथ्या फेरीतच संपुष्टात आले.
पहिला सेट जिंकत शारापोव्हाने सुरुवात चांगली केली. मात्र दुखापतीने ग्रासल्याने पुढच्या दोन्ही सेटमध्ये शारापोव्हाच्या हातून खुप चुका झाल्या. तिच्या सव्र्हिसमधील अचूकता हरवली. सिबुलकोव्हाने याचा फायदा उठवत आपला खेळ उंचावला आणि कारकिर्दीतील उल्लेखनीय विजयाची नोंद केली.
अन्य लढतींमध्ये व्हिक्टोरिया अझारेन्काने दणदणीत विजयाची नोंद केली. सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा यांनी गाशा गुंडाळल्यामुळे अझारेन्काला जेतेपदाची हॅट्ट्कि करण्याची सुवर्णसंधी आहे. तिने अमेरिकेच्या स्लोअन स्टीफन्सचा ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला. रोमानियाच्या सिमोना हालेपने सर्बियाच्या जेलेना जॅन्कोविकला ६-४, २-६, ६-० असे नमवत खळबळजनक विजय मिळवला.
पुरुष गटात रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि अँडी मरे या त्रिकुटाने आपापल्या लढती जिंकत जेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली. भांबावून टाकणाऱ्या आणि आक्रमक खेळ करणाऱ्या दहाव्या मानांकित फ्रान्सच्या जो विलफ्रेड त्सोंगाला ६-३, ७-५, ६-४ असे नमवत फेडररने उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले. पुढच्या सामन्यात फेडररचा अँडी मरेशी मुकाबला होणार आहे. गेल्यावर्षी उपांत्यपूर्व फेरीच्या मॅरेथॉन लढतीतच मरेने फेडररचे आव्हान संपुष्टात आणले होते. या पराभवाची परतफेड करण्याची फेडररला संधी आहे. या विजयाद्वारे फेडररने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत सलग ११व्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा विक्रम केला आहे.
राफेल नदालने आपला झंझावाती फॉर्म कायम राखताना जपानच्या केई निशिकोरीचा पराभव केला. जपानच्या या युवा खेळाडूने नदालला टक्कर दिली मात्र आपला सारा अनुभव पणाला लावत नदालने सरशी साधली. नदालने ही लढत ७-६ (७-३), ७-५, ७-६ (७-३) अशी जिंकली. नदालची पुढची लढत बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हशी होणार आहे. निशिकोरीने अफलातुन खेळ केला. प्रत्येक सेट मी गमावणार अशी स्थिती त्याने निर्माण केली. ही लढत जबरदस्त झाली अशा शब्दांत नदालने आपल्या भावना व्यक्त केल्या. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी अँडी मरेला मात्र संघर्ष करावा लागला. मरेने फ्रान्सच्या स्टीफन रॉबर्टचा ६-१, ६-२, ६-७ (६-८), ६-२ असा पराभव केला. पहिले दोन सेट जिंकत मरेने सुरुवात चांगली केली मात्र त्यानंतर रॉबर्टने मरेला प्रत्येक गुणासाठी झुंजवले. चिवट खेळ करत अखेर मरेने बाजी मारली.
मेलबर्न : लिएण्डर पेस, सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी आपापल्या साथीदारांसह खेळताना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. बिगरमानांकित लिएण्डर पेस आणि स्लोव्हाकियाची डॅनियला हन्तुचोव्हा जोडीने आठव्या मानांकित महेश भूपती आणि एलेना वेस्निना जोडीवर ६-०, २-६, १०-६ अशी मात केली. आता या जोडीचा मुकाबला कॅनडाच्या ख्रिस्तिना लाडेनोव्हिक आणि डॅनियल नेस्टर जोडीशी होणार आहे. सानिया मिर्झाने झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकच्या साथीने खेळताना कॅनडाच्या इग्युेन बोऊचार्ड आणि रशियाच्या वेरा डुशेव्हिना जोडीला ६-४, ६-३ असे नमवले. मिश्र दुहेरीत सानियाने रोमानियाच्या होरिआ टेकाऊसह खेळताना ऑस्ट्रेलियाच्या अॅनास्टासिआ रोडिओनोव्हा आणि ब्रिटनच्या कॉलिन फ्लेमिंग जोडीवर ६-२, ६-२ असा विजय मिळवला. रोहन बोपण्णा आणि स्लोव्हेनियाच्या कतरिना स्त्रेबोटनिक जोडीने ऑस्ट्रेलियाच्या अॅशलेह बार्टी आणि जॉन पीअर्स जोडीवर ७-६ (५), ७-५ अशी मात केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा