पीटीआय, सिंगापूर
भारताचा युवा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेशला जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या पहिल्या डावात चांगल्या सुरुवातीचा फायदा करून घेण्यात अपयश आले आणि अखेरीस विद्यामान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनकडून त्याला हार पत्करावी लागली. त्यामुळे १४ डावांच्या या लढतीत डिंगने १-० अशी आघाडी मिळवली आहे.
गेल्या काही काळापासून लय गमावून बसलेला डिंग डावाच्या सुरुवातीला अडखळताना दिसला. त्याने चाली रचण्यासाठी बराच वेळ घेतला. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या गुकेशने आक्रमक सुरुवात करताना आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, डावाच्या मध्यात त्याच्याकडून चुकीची चाल रचली गेली. त्यामुळे डिंगचा पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला. त्याने आपले मोहरे पटाच्या मध्यावर आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे गुकेशला चाली रचण्यासाठी आपला वेळ घ्यावा लागला. वेळेचे गणित साधताना त्याच्यावर बरेच दडपण आले आणि ४२ चालींअंती त्याने हार पत्करली.
‘‘डिंग लयीत नसल्याचे म्हटले जात होते. मात्र, जगज्जेतेपदाच्या लढतीत तो त्याचा सर्वोत्तम खेळ करेल हे मला अपेक्षित होते आणि तसेच झाले. ही लढत प्रदीर्घ काळ चालणार आहे. अद्याप बरेच डाव शिल्लक आहे. आता या लढतीतील चुरस वाढली आहे,’’ असे पहिल्या डावानंतर गुकेश म्हणाला.
अनपेक्षित सुरुवात
जागतिक अजिंक्यपद लढतीतील सर्वांत युवा आव्हानवीर असणाऱ्या १८ वर्षीय गुकेशने अनपेक्षित पहिली चाल खेळताना आपला राजा पुढे केला. यासह आपले आक्रमक मनसूबे त्याने स्पष्ट केले. याच्या प्रत्युत्तरात डिंगने फ्रेंच बचावपद्धती अवलंबली.
हेही वाचा >>>IPL Auction 2025: कोण आहे प्रियांश आर्य? ३० लाख मूळ किंमत असलेल्या खेळाडूसाठी लागली ३ कोटींची बोली
गुकेशच्या अनपेक्षित सुरुवातीमुळे डिंगला चाली रचण्यासाठी बराच विचार करावा लागला. १२व्या चालीअंती गुकेशकडे डिंगच्या तुलनेत अर्धा तास अधिक होता. मात्र, पुढील आठ चालींनंतर डिंगकडे अधिक वेळ शिल्लक होता. त्यामुळे सुरुवातीच्या अडचणीतून डिंग बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर गुकेश वेळेवर नियंत्रण राखण्यात अपयशी ठरला. दोन्ही खेळाडूंकडे पहिल्या ४० चाली रचण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ होता. यात केवळ दोन सेकंद शिल्लक असताना गुकेशने आपली ४०वी चाल खेळली. मात्र, डिंगने तोवर पटावर भक्कम स्थिती मिळवली होती. पुनरागमनाची शक्यता नसल्याने गुकेशने ४२व्या चालीअंती हार मानली.
काळ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रतिस्पर्ध्याला हरविणे हे खूप मोठे यश मानले जाते. डिंगने हे पहिल्याच डावात करून दाखवले. आता गुकेश या पराभवातून कसा सावरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. डिंगच्या तुलनेत गुकेशच्या गाठीशी अनुभव कमी आहे. मात्र, त्याच्यासाठी सकारात्मक बाब म्हणजे अजूनही १३ डाव शिल्लक आहेत. त्यामुळे त्याला पुनरागमनाची पुरेशी संधी आहे. पहिल्या डावातही त्याची सुरुवात चांगली होती. मात्र, त्याने ‘बी४’वर चाल खेळली आणि त्याचे बरेच मोहरे आत आले. त्यानंतर त्याची आक्रमकताही कमी झाली. त्याने फार जपून खेळण्यास सुरुवात केली आणि याचाच डिंगने फायदा करून घेतला. – रघुनंदन गोखले, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक.