गाइल्स शील्ड स्पर्धेत पात्रतेपेक्षा वयाने मोठे खेळाडू खेळवल्याची तक्रार डॉन बॉस्को शाळेने अल बरकत मलिक शाळेविरोधात बुधवारी मुंबई शालेय क्रीडा संघटनेकडे केली आहे. बुधवारी भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन याला या सामन्यात दुखापत झाली होती. त्या वेळी बांगर यांनी प्रतिस्पर्धी संघात पात्रतेपेक्षा वयाने मोठे खेळाडू असल्याचा आरोप केला होता. गुरुवारी डॉन बॉस्को शाळेने याविरोधात मुंबई शालेय क्रीडा संघटनेकडे निषेध नोंदवत तक्रारही केली आहे.
मंगळवारी आर्यन ‘सिली पॉइंट’ला क्षेत्ररक्षण करण्यास उभा होता, त्या वेळी अल बरकत मलिक शाळेच्या फलंदाजाने जोरदार फटका मारला. तो चेंडू आर्यनच्या ‘हेल्मेट’ला लागून त्याच्या खांद्यावर आदळला. या वेळी कोणतीही वैद्यकीय सुविधा नसल्याने संजय घटनास्थळी दाखल झाला आणि आर्यनला उपचारांसाठी घेऊन गेला. ‘मुंबई शालेय क्रीडा संघटनेने मुलांच्या वयाच्या पात्रतेची दखल घ्यायला हवी. काही शाळांमध्ये पात्रतेपेक्षा वयाने मोठे खेळाडू सर्रास खेळवले जातात. माझ्या मुलावर ही पाळी आली म्हणून मी बोलत नाही, तर ही पाळी कोणत्याही मुलावर येऊ शकते. त्यासाठी संघटनेने कडक पावले उचलायला हवीत’, असे संजय यांनी सांगितले.

Story img Loader