गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेटच्या मधल्या फळीत अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. केदार जाधव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या अशा काही प्रमुख खेळाडूंची नावं या यादीत प्रामुख्याने घ्यावी लागतील. भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून देणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही काही दिवसांपूर्वी पांड्याचं कौतुक केलं होतं. अनेकांनी पांड्याची तुलना कपिल देव यांच्या खेळाशी केली. मात्र भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पांड्याची कपिल देवशी तुलना करणं थांबलं पाहिजे असं मत व्यक्त केलंय. इंडिया टुडे या वृत्तसंस्थेशी बोलताना सौरवने आपली भूमिका मांडली आहे.
अवश्य वाचा – हार्दिक पांड्या कोणत्याही मैदानात षटकार मारु शकतो – रवी शास्त्री
“हार्दिक पांड्या हा गुणी खेळाडू आहे, मात्र लगेचच त्याची कपिल देव यांच्याशी तुलना करणं घाईचं ठरु शकेल. कपिल देव हे सर्वार्थाने महान खेळाडू आहेत. हार्दिक पांड्या पुढची १०-१५ वर्ष याच पद्धतीने खेळत राहिल्यास आपण त्याची कपिल देव यांच्याशी तुलना करु शकतो. सध्याच्या घडीला हार्दिकला त्याच्या खेळाची मजा घेऊ दे, आगामी काळात हार्दिक पांड्याने अधिक आक्रमक खेळ करण्याची अपेक्षा आहे, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हार्दिकच्या खेळात सुधारणा होईल अशी मला आशा आहे.” हार्दिक पांड्याचं कौतुक करताना सौरव गांगुली बोलत होता.
अवश्य वाचा – …पण हार्दिक पांड्याला आणखी मेहनत घ्यावी लागेल : कपिल देव
नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेत हार्दिक पांड्याला मालिकावीराचा किताब मिळाला होता. शनिवारपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी टी-२० मालिकेत समोरासमोर येणार आहे. त्यामुळे या सामन्यांमध्ये हार्दिक कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. ऑस्ट्रेलियानंतर भारत घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्याशी सामना करणार आहे. पण भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता, दोन्ही संघांवर भारत एकतर्फी मात करेल, असं भाकितही सौरव गांगुलीने वर्तवलं आहे.
अवश्य वाचा – ….याचं सगळं श्रेय हार्दिक पांड्याचंच – राहुल द्रवीड