India vs Pakistan, World Cup 2023: विश्वचषक २०२३ मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर, पाकिस्तानी संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. बाबर आझमच्या संघाने ३६ धावांवर आठ विकेट्स गमावल्याने कमालीची नाराजी आहे. क्रिकेट समीक्षकांचा असा अंदाज आहे की, अनेक खेळाडू दीर्घ काळापासून खराब कामगिरी करत आहेत पण असे असूनही त्यांना अनेक वेळा संधी दिली जात आहे. कॅप्टन बाबर आझम याच्या नेतृत्व क्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पराभवानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी बेताल वक्तव्य केल्याने हा संताप आणखी वाढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने स्पष्टपणे सांगितले की, “आर्थरने अनावश्यक विधाने करून लक्ष विचलित करू नये, त्याने भारताविरुद्धच्या सामन्यासाठी त्याची रणनीती आणि संघाची पुढील सामन्यांसाठीची योजना काय आहे हे स्पष्ट करावे.”

हेही वाचा: World Cup 2023: इंग्लंडवरील विजयानंतर अफगाणिस्तानचा राशिद खान झाला भावूक; म्हणाला, “भूकंपात अनेक लोकांनी…”

खरे तर, भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव झाल्यानंतर प्रशिक्षक आर्थर म्हणाले होते की, “अहमदाबादमधील भारत-पाकिस्तान सामना हा आयसीसी स्पर्धेपेक्षा द्विपक्षीय मालिकेसारखा वाटत होता.” प्रशिक्षकाने असेही म्हटले होते की, “मला या सामन्यात ‘दिल-दिल पाकिस्तान’च्या घोषणा ऐकू आल्या नाहीत.” प्रशिक्षकाचा हे सांगण्यामागचा अर्थ असा होता की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारताला चाहत्यांचे पुरेसे समर्थन होते. याचे कारण म्हणजे, पाकिस्तान समर्थकांना भारताने व्हिसा दिला नाही. या सामन्यात बाबर ब्रिगेडला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर लोक उपस्थित नव्हते,” असं मत त्यांनी व्यक्त केले.

आर्थरच्या या वक्तव्यावर वसीम अक्रम नाराज झाला. पाकिस्तानची वृत्तवाहिनी ‘ए स्पोर्ट्स’शी बोलताना तो म्हणाला की, “या सामन्यासाठी पाकिस्तानी संघाच्या रणनीतीवर बोलण्याऐवजी प्रशिक्षक अशी विधाने करून लोकांचे लक्ष दुसरीकडे विचलित करत आहे.” डावखुरा वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला, “तुम्ही सांगा पाकिस्तानची योजना काय होती. कुलदीप यादवला कसे खेळायचे? हे आम्हाला ऐकायचे आहे, ही व्यर्थ चर्चा नका करू. अशा गोष्टींमुळे तुम्ही लोकांचे लक्ष भरकटवू होऊ शकत नाही.”

हेही वाचा: World Cup 2023: “दिल्ली खरंच…” अरुण जेटली स्टेडियममध्ये असे काय घडले की राशिद खानला हे सांगावे लागले, जाणून घ्या

वसीम अक्रमबरोबरच पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला मोईन खाननेही अक्रमच्या विधानाशी सहमती दर्शवली. मोईनने असेही म्हटले की, “आर्थर केवळ लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे.” पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक म्हणाला, “तुम्ही लोकांना मूर्ख बनवू शकत नाहीत. पाकिस्तानच्या पराभवामुळे अनेकांची मनं तुटली आहेत आणि तुम्ही असे बोलून त्यांना जास्त दुखवत आहात. मला वाटते की एक क्रिकेटपटू म्हणून त्याचे काम काय आहे याबद्दल त्याने बोलले पाहिजे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont divert attention wasim akram furious on mickey arthur slammed him for his statement regarding bcci avw
Show comments