आयपीएल २०२३ ची सुरुवात होण्यास अवघे काही दिवस बाकी आहे. या मोठ्या टी-२० लीगचा जोरदार प्रचार सुरू आहे. याचदरम्यान, स्टार स्पोर्ट्सने अनेक प्रसिद्ध खेळाडूंच्या मुलाखतीचे व्हिडीओ जारी केले आहेत. यामध्ये हे सर्व खेळाडू त्यांचे काही मजेदार किस्से शेअर करताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याच्या पहिल्या आयपीएलचा अनुभव शेअर केला आहे. तसेच त्याला त्यावेळी मिळालेल्या पैशांचा गंमतीदार किस्सा सांगितला.
आयपीएलचं पहिलं पर्व २००८ मध्ये खेळवण्यात आलं होतं. तेव्हा २० वर्षीय रोहित शर्माला हैदराबादची फ्रेंचायझी टीम डेक्कन चार्जर्सने खरेदी केलं होतं. हैदराबादने लिलावात तब्बल ७.५ लाख डॉलर्स इतकी मोठी बोली लावत रोहित शर्माला आपल्या संघात घेतलं होतं. त्यावेळी ७.५ लाख डॉलर्स या रकमेचं भारतीय मूल्य ४.८ कोटी रुपये इतकं होतं. २००८ ते २०१० अशी तीन वर्ष रोहितने हैदराबादचं प्रतिनिधीत्व केलं. २०११ मध्ये रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतलं. तो मुबईचा आणि आयपीएलमधला सर्वात यशश्वी कर्णधार आहे. त्याने मुंबईसाठी आतापर्यंत ५ विजेतेपदं पटाकवली आहेत.
“मला माहीत नव्हतं ७.५ लाख डॉलर्स म्हणजे किती”
दरम्यान, रोहितने त्याचा पहिल्या लिलावाचा किस्सा सांगितला. रोहित म्हणाला, “आधी तर मला माहितीच नव्हतं की, ७.५ लाख डॉलर्स म्हणजे किती असतात. लिलावासारखा कार्यक्रम माझ्यासाठी नवीन होता. मी कधी लिलाव पाहिलादेखील नव्हता. हैदराबादने मला खरेदी केलं तेव्हा सर्वात आधी माझ्या डोक्यात विचार आला आता आपण कोणती कार खरेदी करायला हवी. मी केवळ २० वर्षांचा होतो. त्यामुळे तेव्हा मी कार खरेदी करण्याचा विचार करत होतो.”
हे ही वाचा >> मुंबईच्या ब्रेबॉर्नवर धडकलं ‘सोफी’ वादळ, ९ चौकार, ८ षटकारांसह कुटल्या ९९ धावा, युसूफ पठाणचा रेकॉर्ड…
मुंबईचं नेतृत्व हाती घेतल्यापासून आतापर्यंत ९ वर्ष झाली आहेत. त्यापैकी ५ वर्ष मुंबईने स्वतःच्या नावावर केली आहेत. रोहित आता कर्णधार म्हणून १० व्या वर्षात पदार्पण करत आहे.