वानखेडेवरील वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझाने पाच बळी मिळवण्याची किमया साधली आणि आपली ही कामगिरी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला समर्पित केली. ‘‘हा सामना माझ्यासाठीही खास आहे. सचिनच्या दोनशेव्या कसोटी सामन्यात मी चांगली कामगिरी करू शकलो, ही अविस्मरणीय गोष्ट आहे. मी माझी ही कामगिरी सचिनला समर्पित करतो,’’ असे ओझाने सांगितले.
ओझा पुढे म्हणाला की, ‘‘माझे लक्ष फक्त चेंडू कसा टाकावा, याकडेच होते. माझ्यात आणि अश्विनमध्ये चांगला समंजसपणा आहे व त्याचा फायदा मला झाला. योग्य दिशा आणि टप्प्यांवर मी चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. फलंदाजांनी आक्रमण केले तरी मी दडपण घेतले नाही, गोलंदाजीचा आनंद घेत गेलो आणि बळी मिळत गेले. पाच बळी मिळवण्याचा आनंद काही औरच असतो.’’ खेळपट्टीबाबत ओझा म्हणाला की, ‘‘खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळत होती, त्याचबरोबर चेंडू चांगला वळतही होता. त्यामुळे चेंडू जुना झाल्यावर चांगली गोलंदाजी करता आली.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा