क्रिकेटपटूंच्या हकालपट्टीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघात हलकल्लोळ झालेला असला तरी त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघाने करू नये, असे मत भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाला कमी लेखण्याची चूक भारतीय संघाने करू नये, असा माझा भारतीय संघाला सल्ला असेल. खेळाडूंच्या हकालपट्टीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाचे मनोबल चांगले नाही, त्यामुळे भारताने आनंदी होऊन ही आपल्याला मिळालेली एक संधी समजावी, असे गावस्कर यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथे कोणाचे दैव कधीही फिरू शकते. मोहालीच्या खेळपट्टीवर जेम्स पॅटिन्सन प्रभावी ठरला असता, पण त्यांच्याकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. मिचेल स्टार्कला गुणवत्ता सिद्ध करण्याची ही नामी संधी असेल. शेन वॉटसन नसल्याने ऑस्ट्रेलियाची मधली फळी भक्कम नसेल.