दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत आश्वासक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. ३ नोव्हेंबरपासून बांगलादेशच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार असून, या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहेत. निवड समितीने आगामी वर्षातील टी-२० विश्वचषक लक्षात घेता विराट कोहलीला या मालिकेत विश्रांती दिली आहे. विराटऐवजी रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करेल. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर पहिला टी-२० सामना रंगणार आहे. त्याआधीच रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल मोठं विधान केलं आहे.
अवश्य वाचा – धोनीने आता निवृत्त व्हावं का? रोहित शर्मा म्हणतो…
“मला कर्णधारपद भूषवायला आवडतं. ज्या-ज्या वेळी मला ही संधी मिळते त्यावेळी मी कर्णधारपदाला हो म्हणतो. किती काळासाठी कर्णधारपद भूषवायचं ही गोष्ट माझ्यासाठी मोठी नाही. तुम्ही किती काळासाठी कर्णधार असाल हे तुमच्या हाती नाही. तुम्ही एका सामन्यात कर्णधार असा किंवा १०० सामन्यांत कर्णधार असा, तो तुमच्यासाठी एक गौरव असतो.” पहिल्या सामन्याआधी रोहित पत्रकारांशी बोलत होता.
दरम्यान दिल्लीत गेल्या काही दिवसांमध्ये प्रदूषण आणि हवेची खालावलेली पातळी पाहता, अनेकांनी सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी केली होती. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने पहिला टी-२० सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार हे स्पष्ट केलंय. त्यामुळे आगामी बांगलादेश दौऱ्याची सुरुवात भारत कसा करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलिल अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर