इंग्लंडमध्ये होत असलेला विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना, बीसीसीआय आता भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत आहे. सलामीवीरांच्या कामगिरीत नसलेलं सातत्य, मधल्या फळीतल्या फलंदाजीची चिंता यासारख्या अनेक कारणांमुळे बीसीसीआय पर्याय म्हणून अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंतचा विचार करत असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या मते ऋषभ पंतला भारतीय संघात जागा मिळण्याची शक्यता जरा कमीच आहे. बंगळुरुत एका खासगी कार्यक्रमात बोलत असताना गौतमने विश्वचषकासाठी धोनी आण दिनेश कार्तिक हेच योग्य उमेदवार असल्याचं म्हटलंय.
“ऋषभला विश्वचषकासाठीच्या संघात जागा मिळेल याची खात्री मला वाटत नाही. धोनी आणि दिनेश कार्तिक सध्या संघात आहेत, त्यामुळे ऋषभला अजुन थोडा वेळ वाट पाहावी लागू शकते. गेल्या काही मालिकांमध्ये तो चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्या कामगिरीमुळे संघातल्या सिनीअर खेळाडूंनाही सतत चांगली कामगिरी करावी लागते आहे, हे भारतीय क्रिकेटसाठी चांगलं लक्षण आहे.” गौतमने आपलं मत मांडलं.
सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेत ऋषभला भारतीय संघात जागा दिलेली नाहीये, मात्र टी-20 मालिकेसाठी पंत भारतीय संघातून खेळणार आहे. पहिला वन-डे सामना जिंकून भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना 26 जानेवारी रोजी होणार आहे.
अवश्य वाचा – वर्णभेदी टिकेनंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज म्हणतो, मला माफ करा…