ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग हा व्यावसायिक बॉक्सर झाला असला, तरी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर एम.सी.मेरी कोम हिने आपण हौशीच खेळाडू राहणार असल्याचे सांगितले. स्पर्धात्मक बॉक्सिंगमधून निवृत्त झाल्यानंतर अकादमीवर लक्ष केंद्रित करणार आहे असेही ती म्हणाली.
मेरी कोम हिने सांगितले,की रिओ ऑलिम्पिक ही आपली शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा असेल. त्यानंतर मी कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नाही. रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पदक मिळविण्यासाठी मी खूप मेहनत करीत आहे. हे माझ्याबरोबरच भारतासही गौरवशाली पदक असणार आहे.
मेरी कोम या ३२ वर्षीय खेळाडूने उदयोन्मुख व शालेय गटातील खेळाडूंना प्राथमिक व स्पर्धात्मक बॉक्सिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी अकादमी स्थापन केली आहे. याबाबत तिने सांगितले,की या खेळात भारतास भरपूर पदकांची कमाई व्हावी यासाठी माझ्या अकादमीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व सुविधा देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. मला ऑलिम्पिक पदकासाठी जे कष्ट करावे लागले आहेत व ज्या यातना मी भोगल्या आहेत, त्याची जाणीव माझ्या शिष्यांना करुन देणार आहे. त्यापासून प्रेरणा घेत ते ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी मेहनत करतील अशी मला खात्री आहे.
महिलांच्या आत्मसंरक्षणासाठी शासनाने शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली पाहिजेत, अशीही सूचना मेरी कोम हिने केली. विजेंदरने व्यावसायिक बॉक्सर होण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूने कोणत्या स्पर्धामध्ये करिअर करायचे हा वैयक्तिक निर्णय असतो व त्यावर मी मत व्यक्त करणे उचित ठरणार नाही, असे मेरी कोम हिने सांगितले.

Story img Loader