|| प्रशांत केणी
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट २०००मध्ये उत्तेजक चाचणीत दोषी आढळली होती. सर्दी झाली म्हणून घेतलेल्या औषधात उत्तेजक पदार्थ आढळले. त्यामुळे तिची कारकीर्द डागाळली आणि बंदीच्या शिक्षेलाही सामोरे जावे लागले. आता मुंबईचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि नाशिकची धावपटू संजीवनी जाधव उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्याच्या दोन ताज्या घटना घडल्या आहेत.
खोकल्यासाठी घेतलेल्या औषधाद्वारे पृथ्वीने उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे सिद्ध झाले आहे, तर आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यामुळे संजीवनी उत्तेजकांच्या कचाटय़ात सापडली आहे. या तिन्ही घटनांचा समान धागा म्हणजे अजाणतेपणा. १९ वर्षांमध्ये देशातील आणि महाराष्ट्रातील उत्तेजकविरोधी चळवळ किती मर्यादित राहिली आहे, हेच या तीन घटनांमधून स्पष्ट होत आहे. पृथ्वीवरील कारवाईबाबत तांत्रिक अडचणी मोठय़ा प्रमाणात आहेत.
खेळाडू उत्तेजकांचे सेवन का करतात? याचे पहिले उत्तर अजाणतेपणा आहे. उत्तेजक पदार्थाचा समावेश असलेली सर्दी-खोकल्याची असंख्य औषधे उपलब्ध आहेत. परंतु त्यांचे सेवन करताना हेळसांडपणा दाखवला जातो. दुसरे म्हणजे कामगिरी उंचावण्याचे प्रचंड दडपण. यात स्वत: अन्य खेळाडूंपेक्षा सरस ठरण्याची अभिलाषा आणि अपेक्षा अंतर्भूत असते. त्यामुळे प्रशिक्षक, पालक खेळाडूला या वाईट मार्गाकडे प्रेरित करतात. उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेला कुस्तीपटू नरसिंग यादव २०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरला होता. त्याला आहारातून उत्तेजक पदार्थ देण्याचा कट रचण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु या प्रकरणातील सत्याचा अद्याप उलगडा झालेला नाही. म्हणजेच कुरघोडी करण्यासाठीसुद्धा ‘उत्तेजकप्रयोग’ होऊ शकतो.या संदर्भातील साक्षरतेसाठी केंद्राच्या आणि राज्यांच्या अर्थसंकल्पात उत्तेजकविरोधी अभियानासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक तरतुदीची आवश्यकता आहे.
उत्तेजक पदार्थ म्हणजे काय?
उत्तेजक म्हणजे असा पदार्थ ज्याच्या सेवनाने नैसर्गिक क्षमतेत कृत्रिम वाढ होते. क्रीडाप्रकारांमध्ये खेळाडूंच्या कौशल्याचा कस लागतो. परंतु इंजेक्शन किंवा गोळ्यांद्वारे घेतलेल्या उत्तेजकांमुळे खेळाडूला नियमबा पद्धतीने फायदा होतो.
उत्तेजक पदार्थ कसे ओळखावेत?
जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्था (वाडा) प्रतिबंधित उत्तेजकांची यादी ठरावीक कालावधीने जाहीर करते. जसे पृथ्वीच्या उत्तेजक चाचणीत टब्र्यूटलान हा प्रतिबंधित रासायनिक पदार्थ सापडला. त्याचप्रमाणे ‘वाडा’कडून प्रतिबंधित रासायनिक पदार्थाची यादी प्रसारित केली जाते. खेळाडूंना या रासायनिक घटकांची माहिती नसल्यामुळे उपचार घेताना अजाणतेपणे या औषधांचा वापर होऊ शकतो.
अव्वल १० राष्ट्रांमध्ये भारत
उत्तेजकांच्या नियमांचा भंग करणाऱ्या राष्ट्रांची दरवर्षी प्रसारित होते. भारताने या यादीत गेली अनेक वष्रे अव्वल १० राष्ट्रांमधील आपले स्थान अबाधित राखले आहे. २०१८-१९मध्ये १८७ खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले आहेत. यात ७० शरीरसौष्ठवपटू, ६० वेटलिफ्टिंगपटू, ५५ अॅथलेटिक्सपटू, ४० पॉवरलिफ्टिंगपटू आणि २० कुस्तीपटू यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यात वरिष्ठच नव्हे, तर विविध वयोगटांमधील खेळाडूसुद्धा मागे नाहीत. १७ आणि २१ वर्षांखालील वयोगटांच्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धामध्येही गेल्या वर्षी १२ आणि या वर्षी १३ प्रकरणे उजेडात आली आहेत.
‘बीसीसीआय’ला अडचण ‘नाडा’ची
पृथ्वीसहित तीन खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ‘बीसीसीआय’ला ‘‘तुम्हाला उत्तेजक चाचणी घेण्याचा अधिकार कुणी दिला?’’ असा सवाल केला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘बीसीसीआय’ला ‘नाडा’चे वर्चस्व अडचणीचे वाटते आहे. ‘नाडा’ची उत्तेजक प्रतिबंधक चळवळ आणि त्यांचे नमुने घेण्याची पद्धती खराब दर्जाची आहे, असे ‘बीसीसीआय’चे म्हणणे आहे. जुलै २००६पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ‘वाडा’च्या उत्तेजक प्रतिबंधक नियमांचा स्वीकार केला आहे. त्यामुळे ‘ठावठिकाणा’ (व्हेअरअबाऊट्स) या नियमाला विरोध करणाऱ्या ‘बीसीसीआय’ला ‘वाडा’च्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. पण क्रीडा मंत्रालयाशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय क्रीडा महासंघांमध्ये समाविष्ट नसल्यामुळे ‘बीसीसीआय’ला ‘नाडा’शी संलग्नता अमान्य आहे. ‘बीसीसीआय’ने २००८च्या इंडियन प्रीमियर लीगपासून ‘बीसीसीआय’ स्वीडनस्थित ‘वाडा’ची मान्यता असलेल्या आंतरराष्ट्रीय उत्तेजक चाचणी आणि व्यवस्थापन या संस्थेकडून चाचण्या करून घेत आहे. पण ‘नाडा’शी बांधिलकी नसल्यामुळे ‘बीसीसीआय’ ही संघटना ‘वाडा’च्या अधिपत्याखाली नाही.
‘वाडा’च्या उत्तेजक प्रतिबंधाच्या यादीत इतक्या रासायनिक पदार्थाचा समावेश आहे की, खेळाडूंना त्यांची माहिती होणे शक्य नाही. यापैकी बऱ्याच उत्तेजक घटकांबाबत डॉक्टरसुद्धा अनभिज्ञ असतात. त्यामुळे खेळाडूंनी कोणत्याही गोष्टींचे सेवन करण्यापूर्वी क्रीडावैद्यकतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. याचप्रमाणे उत्तेजकविरोधी चळवळ अधिक सशक्त करण्यासाठी राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही स्पर्धेच्या कालखंडात खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि संघटकांसाठी यासंदर्भातील मार्गदर्शन वर्ग बंधनकारक करण्याची नितांत गरज आहे. – डॉ. निखिल लाटे, क्रीडावैद्यकतज्ज्ञ
prashant.keni@expressindia.com