भारतीय क्रीडा क्षेत्राला काळिमा फासणारी घटना शनिवारी उघडकीस आली. भारताच्या २१ वेटलिफ्टिंगपटू प्रतिबंधक उत्तेजकाचे सेवन चाचणीत दोषी आढळले असून त्यांच्यावर तात्पुरती निलंबनाची कारवाई भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने (आयडब्ल्यूएफ) केली आहे. या दोषींमध्ये दिल्ली, पंजाब व हरियाणाच्या खेळाडूंचे प्रमाण अधिक असून आयडब्ल्यूएफ या राज्यांवरही बंदी टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतात झालेल्या विविध स्पर्धामध्ये केलेल्या चाचणीत या २१ वेटलिफ्टिंगपटूंनी प्रतिबंधक उत्तेजकाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी बहुतेक खेळाडू हे यमुनानगर येथे झालेल्या राष्ट्रीय युवा व कनिष्ठ वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पध्रेत दोषी आढळले आहेत.
‘‘ प्रतिबंधक उत्तेजक सेवन केल्याप्रकरणी २१ वेटलिफ्टिंगपटूंवर तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्या ‘ब’ अहवालाची आम्हाला प्रतीक्षा आहे.’’ अशी माहिती आयडब्ल्यूएफचे सरचिटणीस सहदेव यादव यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, ‘‘भारतीय क्रीडा इतिहासातील अशा प्रकारे कारवाई झालेली ही मोठी घटना आहे. महाविद्यालयीन, पोलीस स्पर्धा, रेल्वे स्पर्धा आदीं स्पर्धामध्ये मिळून एकूण २१ वेटलिफ्टर्स दोषी आढळले आहेत.’’  
‘‘‘ब’ अहवालातही हे खेळाडू दोषी आढळल्यास त्यातील पहिल्यांदा दोषी ठरलेल्या खेळाडूंवर चार वर्षांची बंदी घातली जाईल. आयडब्ल्यूएफच्या नियमानुसार १२ महिन्यांत दोन किंवा त्याहून अधिक प्रतिबंधक उत्तेजक सेवनाच्या घटना उघडकीस आल्यास, राज्य संघटनेवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात येईल. प्रतिबंधक उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी आढळलेल्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांवरही बंदीची घालण्यात येईल,’’ अशी माहिती यादव यांनी दिली.

*राष्ट्रीय युवा व कनिष्ठ वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पध्रेत आठ लिफ्टर दोषी
*यामध्ये ६३ किलो वजनी गटात युवा व कनिष्ठ विभागात सुवर्णपदक पटकावणाऱ्या पंजाबची सिमरनप्रीत कौरसह, अमरीतपाल सिंग (८५ किलो, सुवर्ण) आणि अर्शदीप
कौर (५८ किलो, रौप्य) यांचा समावेश
आहे.
*केरळमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये चारपैकी तीन वेटलिफ्टिंगपटू प्रतिबंधक उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळले आणि तिघेही उत्तरेकडील राज्याचे खेळाडू आहेत.
*यामध्ये २००६च्या राष्ट्रकुल स्पध्रेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या गीता राणी (पंजाब), हरजीत कौर (हरियाणा) आणि मांगटे पी कोम (चंदिगड) यांच्यासह महाराष्ट्राच्या कोमल वाकळेचा समावेश आहे.  

Story img Loader