भारतीय क्रीडा क्षेत्राला काळिमा फासणारी घटना शनिवारी उघडकीस आली. भारताच्या २१ वेटलिफ्टिंगपटू प्रतिबंधक उत्तेजकाचे सेवन चाचणीत दोषी आढळले असून त्यांच्यावर तात्पुरती निलंबनाची कारवाई भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने (आयडब्ल्यूएफ) केली आहे. या दोषींमध्ये दिल्ली, पंजाब व हरियाणाच्या खेळाडूंचे प्रमाण अधिक असून आयडब्ल्यूएफ या राज्यांवरही बंदी टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतात झालेल्या विविध स्पर्धामध्ये केलेल्या चाचणीत या २१ वेटलिफ्टिंगपटूंनी प्रतिबंधक उत्तेजकाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी बहुतेक खेळाडू हे यमुनानगर येथे झालेल्या राष्ट्रीय युवा व कनिष्ठ वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पध्रेत दोषी आढळले आहेत.
‘‘ प्रतिबंधक उत्तेजक सेवन केल्याप्रकरणी २१ वेटलिफ्टिंगपटूंवर तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्या ‘ब’ अहवालाची आम्हाला प्रतीक्षा आहे.’’ अशी माहिती आयडब्ल्यूएफचे सरचिटणीस सहदेव यादव यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, ‘‘भारतीय क्रीडा इतिहासातील अशा प्रकारे कारवाई झालेली ही मोठी घटना आहे. महाविद्यालयीन, पोलीस स्पर्धा, रेल्वे स्पर्धा आदीं स्पर्धामध्ये मिळून एकूण २१ वेटलिफ्टर्स दोषी आढळले आहेत.’’
‘‘‘ब’ अहवालातही हे खेळाडू दोषी आढळल्यास त्यातील पहिल्यांदा दोषी ठरलेल्या खेळाडूंवर चार वर्षांची बंदी घातली जाईल. आयडब्ल्यूएफच्या नियमानुसार १२ महिन्यांत दोन किंवा त्याहून अधिक प्रतिबंधक उत्तेजक सेवनाच्या घटना उघडकीस आल्यास, राज्य संघटनेवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात येईल. प्रतिबंधक उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी आढळलेल्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांवरही बंदीची घालण्यात येईल,’’ अशी माहिती यादव यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा