* रिअल माद्रिदची व्हॅलाडोलिडवर मात
* बार्सिलोनाचे मात्र जेतेपद लांबणीवर
ख्रिस्तियानो रोनाल्डोने दुहेरी गोल करीत रिअल माद्रिदच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळेच रिअल माद्रिदने स्पॅनिश फुटबॉल लीग स्पर्धेत व्हॅलाडोलिडवर ४-३ अशा फरकाने विजय मिळविण्याची किमया साधली. परंतु रिअल माद्रिदच्या या विजयामुळे बार्सिलोनाचे जेतेपद मात्र लांबणीवर पडले आहे. आता स्पध्रेच्या गुणतालिकेत बार्सिलोना (८५) आणि रिअल माद्रिद (७७) या दोन संघांमध्ये आठ गुणांचा फरक आहे.
ऑस्कर गोन्झालीझने ८व्या मिनिटाला गोल करत व्हॅलाडोलिड संघाचे खाते उघडले. यानंतर मार्क व्हॅलिएन्टचा स्वयंगोल व्हॅलाडोलिडला महागात पडला. मग ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शानदार हेडरच्या जोरावर रिअलने २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर व्हॅलाडोलिडच्या जेव्ही ग्युएराने गोल करत रिअलची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरानंतर काकाने गोल करत रिअलची आघाडी वाढवली. यानंतर मात्र दोन्ही संघांनी गोलसाठी संघर्ष करावा लागला. ७०व्या मिनिटाला रोनाल्डोने आणखी एक गोल करत रिअलची आघाडी भक्कम केली. सामना संपण्यासाठी अवघी काही मिनिटे बाकी असताना व्हॅलाडोलिडच्या सास्त्रेने गोल केला. यानंतर मात्र रिअलने आपला बचाव अभेद्य करत ४-३ अशा फरकाने सामना जिंकला. चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी हुकलेल्या रिअल माद्रिदने या सामन्यात विजय मिळवत आपण जिंकणे विसरलो नसल्याचे सिद्ध केले. हंगामातील शेवटच्या सामन्यापर्यंत सातत्यपूर्ण खेळ करणे, हे उद्दिष्ट असल्याचे रिअल माद्रिदचा बचावपटू पेपेने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा