चेन्नई : भारतीय पुरुष संघाने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील निर्विवाद वर्चस्व कायम राखताना बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानावर ४-० असा विजय मिळवला. या पराभवासह पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
चार विजय आणि एक अनिर्णित लढतीसह भारताने १३ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. सामन्यातील चारही सत्रांत एकेक गोल करून भारताने नवख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या पाकिस्तान संघावर पूर्ण वर्चस्व राखले. भारताने पाच पेनल्टी कॉर्नरपैकी तीनवर गोल करण्याची किमया साधली. यातील दोन गोल कर्णधार हरमनप्रीत सिंगने (१५, २३व्या मिनिटाला), तर एक गोल जुगराज सिंगने (३६व्या मि.) केला. अखेरच्या सत्रात आकाश दीपने (५५व्या मि.) मैदानी गोल करून भारताची आघाडी वाढवली.
मलेशियाने गतविजेत्या कोरियावर एका गोलने मात करत दुसरा क्रमांक मिळवला. कोरियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. जपानने चीनवर २-१ असा विजय मिळविल्याने पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय अनिवार्य होता. मात्र, भारताच्या ताकदवान खेळापुढे पाकिस्तानच्या खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधीच मिळाली नाही. भारताचे आक्रमण रोखताना पाकिस्तानच्या बचाव फळीची कसोटी लागली. पाकिस्तानचे आक्रमकपटूही फारशी चमक दाखवू शकले नाहीत. त्यातच घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे भारतीय खेळाडूंचा खेळ अधिकच उंचावला. या मानसिक दडपणाचा पाकिस्तानचे खेळाडू सामना करू शकले नाहीत.
भारताने सामन्याला सावध सुरुवात केली, पण लय मिळाल्यावर सामन्यावर मिळवलेली पकड अखेपर्यंत सोडली नाही. पूर्वार्धातील पहिल्या सत्रात मिळवलेल्या पहिल्या कॉर्नरवर हरमनप्रीतने भारताचे खाते उघडले. त्यानंतर लगोलग दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच आणखी एका कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करून हरमनप्रीतने भारताची आघाडी वाढवली. मध्यंतराच्या २-० अशा आघाडीनंतर उत्तरार्धालाही भारताने वेगवान सुरुवात करून आणखी एक कॉर्नर मिळवला. त्यावर जुगराजने गोल नोंदवून भारताची आघाडी भक्कम केली. अखेरच्या सत्रातील अखेरच्या टप्प्यात आकाश दीपने मनदीपच्या पासवर मैदानी गोल करून भारतीय संघाच्या सफाईदार विजयावर शिक्कामोर्तब केले.
उपांत्य लढती
* मलेशिया वि. कोरिया
* भारत वि. जपान