Usman Khawaja, Australia vs Pakistan 2nd Test Match: नुकताच ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा काळ्या हाताची पट्टी बांधून मैदानात खेळायला आला होता. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) उस्मान ख्वाजाला फटकारले. याआधी उस्मान ख्वाजाला पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत गाझा सपोर्टिंग शूज घालून खेळायचे होते, पण आयसीसीने त्याला रोखले. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, उस्मान ख्वाजा हा नियमांविरुद्ध वागत आहे, त्यामुळे त्याला रोखण्यात आले.
‘स्वातंत्र्य हा मानवी हक्क आहे, सर्वांचे जीवन समान आहे‘
आयसीसीवर टीका करत उस्मान ख्वाजाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे उस्मान ख्वाजाने आयसीसीवर आपला राग व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, “स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे, प्रत्येकाचे जीवन समान आहे.’ वास्तविक, उस्मान ख्वाजाने आयसीसीच्या या वागणुकीवर “दुटप्पी भूमिका,” असे म्हणत ताशेरे ओढले. उस्मान ख्वाजाची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उस्मान ख्वाजाने आयसीसीवर शाब्दिक हल्लाबोल करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये केशव महाराजाच्या बॅटवर ओम चिन्ह आहे. त्याचप्रमाणे निकोलस पूरन आणि इतर कोणत्याही फलंदाजाच्या बॅटवर वेगवेगळ्या खुणा दाखविण्यात आल्या. याद्वारे त्याने स्पष्टपणे आयसीसीवर हल्ला केला आणि डबल स्टँडर्ड हॅशटॅग वापरून इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. तो स्पष्टपणे म्हणाला की, “इतर खेळाडूही असेच करू शकतात तर मग माझी मागणी का फेटाळली गेली? यातून आयसीसीची दुटप्पी भूमिका दिसून येते.”
उस्मान ख्वाजाची चूक काय? दुहेरी मापदंड का?- तबरेज शम्सी
दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकीपटू तबरेज शम्सीने या शूजचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यापुढे त्याने असे लिहिले आहे की, “आयसीसीने सांगावे की उस्मान ख्वाजाचा नेमका दोष काय आहे? दुहेरी मापदंड का?” तबरेज शम्सीने आपल्या पोस्टमध्ये उस्मान ख्वाजा आणि आयसीसीला टॅग केले आहे. यामुळे आता क्रिकेट वर्तुळात आयसीसी आणि खेळाडू यांच्यात वाकयुद्ध सुरू झाले आहे.
‘उस्मान ख्वाजाला आयसीसीची परवानगी मिळाली नाही पण…’
अलीकडेच, आयसीसीच्या प्रवक्त्याने यापूर्वी म्हटले होते की, “उस्मान ख्वाजाने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान जे केले ते नियमांच्या विरोधात होते. यासाठी उस्मान ख्वाजाने आयसीसीची परवानगी घेतली नव्हती. पण असे असतानाही उस्मान ख्वाजाने आर्मबँड घातला होता. मात्र, यानंतर आयसीसीने उस्मान ख्वाजाला फटकारले.” एमसीजी कसोटी दरम्यान, उस्मान ख्वाजाने त्याच्या मुलींची नावे आयशा आणि आयला यांनी त्याच्या शूजवर लिहिली आणि ती सर्वाना दिसत आहेत, जी एक वैयक्तिक आणि अर्थपूर्ण हावभाव दाखवत होते. उस्मान ख्वाजाने आयसीसीने घेतलेल्या कठोर भूमिकेवरही टीका केली.
दुसऱ्या कसोटी सामन्यात काय झाले?
मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला असून आतापर्यंत केवळ ४२.४ षटकांचा खेळ झाला आहे. पावसामुळे खेळ अद्याप थांबला असून त्यामुळे चहापानाची वेळही पुढे ढकलण्यात आली. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दोन गडी गमावून खेळ थांबेपर्यंत ११४ धावा केल्या होत्या. मार्नस लाबुशेन १४ धावांवर तर स्टीव्ह स्मिथ २ धावांवर नाबाद आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने चांगली सुरुवात केली होती. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. ही भागीदारी आघा सलमान आगाने मोडली. त्याने वॉर्नरला बाबर आझमकरवी झेलबाद केले. वॉर्नरने ८३ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या. तर ख्वाजाने १०१ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ४२ धावांची खेळी केली. ख्वाजाला हसन अलीने झेलबाद केले. स्टीव्ह स्मिथ ७५ चेंडूत २६ धावा करून आमिर जमालच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाकिस्तानकडून हसन आणि सलमानला प्रत्येकी एक विकेट मिळाली आहे.