विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा देताना क्रिकेटच्या दुनियेचा महान शहेनशहा सचिन तेंडुलकरला एक खंत अजूनही जाणवते आहे. १९९२च्या विश्वचषक स्पध्रेत जेव्हा तो सहभागी झाला, तेव्हा १९८०चे दशक गाजविणाऱ्या महान क्रिकेटपटूंसोबत खेळण्याची संधी मिळाल्याचा त्याला आनंद झाला होता. परंतु आपला आवडता नायक विवियन रिचर्ड्सविरुद्ध खेळता न आल्याचे शल्य त्याला बोचते आहे.
१९८७ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात झाली होती. त्यावेळी सचिन ‘बॉल बॉय’ म्हणून सीमारेषेच्या पलीकडे कार्यरत होता. पण पुढच्याच विश्वचषकात त्याला क्रिकेटजगतामधील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली.
पौगंडावस्थेतील सचिन १९९२च्या विश्वचषक स्पध्रेत सहभागी झाला होता. त्या स्पध्रेत सचिनने ४७च्या सरासरीने २८३ धावा काढल्या होत्या. याशिवाय पाकिस्तान आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयांमध्ये त्याने सामनावीर पुरस्कारांवर नाव कोरले होते.
‘‘इयान बोथम, ग्रॅहम गुच, केपलर वेसल्स, इम्रान खान, जावेद मियाँदाद, वसिम अक्रम, डेसमंड हेन्स, रिची रिचर्ड्सन, माल्कम मार्शल आणि कर्टली अ‍ॅम्ब्रोस यांच्यासारख्या क्रिकेटमध्ये मोठे नाव असलेल्या खेळाडूंविरुद्ध खेळणे, हे खास होते. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो,’’ असे सचिन म्हणतो. तो पुढे म्हणाला, ‘‘वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्याविरुद्ध सामना खेळता आला नाही, याची रुखरुख मनाला आताही जाणवते आहे. रिचर्ड्स वेस्ट इंडिज संघात नसल्यामुळे माझी घोर निराशा झाली. ते आताही माझे आवडते क्रिकेटपटू आहेत.
१९९२च्या विश्वचषकाने अनेक नव्या खेळाडूंचाही जागतिक क्रिकेटच्या व्यासपीठावर प्रवेश झाला. जे पुढे घरोघरी क्रिकेटचे सच्चे राजदूत म्हणून लोकप्रिय झाले, असे सचिनने सांगितले. ‘‘१९९२च्या विश्वचषकाने अ‍ॅलन डोनाल्ड नावारूपास आला. त्याचप्रमाणे जॉन्टी ऱ्होड्स. इन्झमाम-उल-हकला त्याने धावचीत केल्याचा क्षण त्या विश्वचषकामधील संस्मरणीय प्रसंग होता,’’ अशा शब्दांत सचिनने आठवणींना उजाळा दिला.
‘‘१९८७चा काळ मला आठवतो, तेव्हा मी बॉल बॉयच्या भूमिकेत होतो. पण पुढच्या विश्वचषक स्पध्रेत मोठे संक्रमण झाले आणि मी खेळाडू म्हणून सहभागी झालो. त्यावेळी सर्व संघांचे सांघिक छायाचित्रण सिडनीत झाले होते, ते मला आताही आठवते. मग डार्लिग हार्बर या ठिकाणी रात्रीच्या भोजनाचा शानदार कार्यक्रम झाला. एकाच व्यासपीठावर जागतिक क्रिकेटमधील सर्व महान खेळाडूंची उपस्थिती, हा अनुभव माझ्यासाठी अविश्वसनीय होता.’’
-सचिन तेंडुलकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा