DPL 2024 Final East Delhi Raiders won the 1st DPL title : ईस्ट दिल्ली रायडर्सने दिल्ली प्रीमियर लीग टी-२० च्या पहिल्या सत्राचे विजेतेपद जिंकून इतिहास लिहला आहे. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या रोमांचक अशा अंतिम सामन्यात ईस्ट दिल्ली रायडर्सने साऊथ दिल्ली सुपरस्टार्सचा ३ धावांनी पराभव करत विजय मिळवला. मयंक रावतची स्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ईस्ट दिल्ली संघाने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.
ईस्ट दिल्ली रायडर्कसडून मयंक रावतची शानदार खेळी –
या सामन्यात ईस्ट दिल्ली रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पॉवरप्लेमध्येच अनुज रावत (१० धावा) आणि सुजल सिंग (५ धावा) या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्याने त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. यानंतर हिम्मत सिंग (२० धावा) आणि हार्दिक शर्मा (२१ धावा) यांनी काही काळ डाव सांभाळला, पण त्यांनाही मोठी खेळी करता आली नाही.
या कठीण परिस्थितीत मयंक रावतने आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने अवघ्या ३९ चेंडूंत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ७८ धावा केल्या. त्याच्यासह काव्य गुप्ता (१६ धावा) आणि हर्ष त्यागी (१७ धावा) यांनीही उपयुक्त योगदान दिले. मयंक रावतच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे ईस्ट दिल्ली रायडर्सने २० षटकांत ५ बाद १८२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. विशेष बाब म्हणजे मयंकने शेवटच्या षटकात आयुष बदोनीच्या चेंडूंवर सलग पाच षटकार ठोकले, त्यामुळे धावसंख्या १८३ पर्यंत पोहोचली.
हेही वाचा – IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! यश दयालसह ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
शेवटच्या षटकापर्यंत रंगला रोमांचक सामना –
१८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या साऊथ दिल्ली सुपरस्टार्सची सुरुवातही खराब झाली. त्यांनी प्रियांश आर्य (६ धावा) आणि आयुष बदोनी (७ धावा) या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना लवकर गमावले. प्रभावशाली खेळाडू कुंवर बिधुरी (२२ धावा) याला मयंक रावतने झेलबाद केले आणि पॉवरप्लेनंतर त्यांची धावसंख्या ५७/३ वर नेली. तेजस्वी दहियाने एका टोकाकडून चमकदार कामगिरी करत आपले अर्धशतक पूर्ण केले, मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही.
दहियाने अखेरच्या षटकांमध्ये झटपट धावा करत साऊथ दिल्ली सुपरस्टार्सच्या आशा जिवंत ठेवल्या. पण सिमरजीत सिंगच्या चेंडूवर षटकार ठोकून तोही बाद झाला. अंतिम षटकात दिग्वेश राठी (२१* धावा) च्या प्रयत्नानंतरही साऊथ दिल्ली सुपरस्टार्स संघ २० षटकात ९ बाद १८० धावाच करू शकला आणि ३ धावांनी पराभूत झाला. अशा प्रकारे ईस्ट दिल्ली रायडर्सने मयंक रावतच्या खेळीच्या आणि गोलंदाजाच्या कामगिरी जोरावर दिल्ली प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकावले.