Rahul Dravid vs Virender Sehwag: जवळपास एक दशकानंतर, भारतीय क्रिकेटच्या दोन दिग्गज (वीरेंद्र) सेहवाग आणि (राहुल) द्रविडची नावे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) धावफलकावर दिसली. कर्नाटक आणि दिल्ली यांच्यात सोमवारपासून सुरू झालेल्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये १६ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत ज्युनिअर द्रविड आणि ज्युनिअर सेहवाग आमनेसामने आहेत. या सामन्यात कर्नाटक अंडर-१६ संघाचा कर्णधार अन्वय द्रविड आणि दिल्लीचा सलामीवीर आर्यवीर सेहवाग आपल्या राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, पहिल्या दिवसाच्या खेळात ज्युनियर द्रविडची बॅट चालली नाही. दुसरीकडे, ज्युनियर सेहवाग अर्धशतक करून खेळत आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर दिल्लीचा संघ कर्नाटकवर भक्कम आघाडी घेताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्वय हा द्रविडचा धाकटा मुलगा आहे

अन्वय हा भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक द्रविडचा धाकटा मुलगा आहे. तो संघाचा यष्टिरक्षकही आहे. सेहवागचा मोठा मुलगा आर्यवीर हा त्याच्या वडिलांप्रमाणेच आक्रमक सलामीवीर फलंदाज आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या पुढच्या पिढीसाठी हे वर्ष चांगले राहिले आहे. अर्जुन तेंडुलकरने यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि तो आता गोव्याकडून खेळत आहे. दुसरीकडे, द्रविडचा मोठा मुलगा समित याने राष्ट्रीय कूचबिहार करंडक १९ वर्षांखालील स्पर्धेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले.

हेही वाचा: IND vs NEP U-19: छोट्या उस्तादांची जबरदस्त कामगिरी! नेपाळने टीम इंडियापुढे टेकले गुडघे, १० गडी राखून दणदणीत विजय

आज सामन्याचा दुसरा दिवस आहे

मंगळागिरी येथील आंध्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दिल्ली आणि कर्नाटक यांच्यात सुरू असलेल्या १६ वर्षांखालील सामन्यात कर्नाटक संघ ५६.३ षटकात १४४ धावांवर बाद झाला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अन्वयला खातेही उघडता आले नाही. त्याला दिल्लीचा सर्वात यशस्वी गोलंदाज आयुष लाक्राने बाद केले. प्रत्युत्तरात दिल्लीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३० षटकांत १ बाद १०७ धावा केल्या आहेत. आर्यवीर ९८ चेंडूत ५० धावा केल्यानंतर खेळत आहे. त्याने आतापर्यंतच्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार मारला आहे.

हेही वाचा: IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शुबमन-ऋतुराज सलामीला फलंदाजी करणार? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११

या दोघांपूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रवेश केल्यावर चर्चेत आला होता. तो सध्या आयपीएल खेळत आहे. अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळत आहे. आता द्रविड आणि सेहवागच्या मुलांनीही आपल्या खेळाने चर्चेत येण्यास सुरुवात केली आहे. नुकताच द्रविड विश्वचषकानंतर मुलाचा सामना पाहण्यासाठी गेला होता आणि त्याचा फोटो व्हायरल झाला होता. प्रशिक्षक असताना द्रविडला त्याच्या मुलांकडे फारसे लक्ष देता आले नाही. मात्र, जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो त्याच्या मुलांच्या खेळाची माहिती नक्कीच घेत असतो. द्रविडचा दुसरा मुलगा समितही देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. सचिन, सेहवाग आणि द्रविड यांच्यासारखे महान फलंदाज त्यांची मुलेही बनू शकतील का? हे पाहणे आगामी काळात उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dravids son out on 0 and sehwags sons half century two legendary sons face to face in bcci tournament avw
Show comments