मौजमस्ती करण्याच्या दिवसात त्याने बुद्धिबळाचा वसा हाती घेतला.. अनेक यश-अपयश पचवून त्याने मार्गक्रमणा कायम ठेवली.. तब्बल १३ वेळा ग्रँडमास्टर किताबाने त्याला हुलकावणी दिली.. पण आपले ध्येय गाठण्याची त्याची इच्छाशक्ती तसूभरही कमी झाली नाही.. कठोर परिश्रम आणि आपल्या कामगिरीला सुरेख कौशल्याची साथ देत त्याने वयाच्या १९व्या वर्षी ग्रँडमास्टर किताबाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला.. तो म्हणजे विदित गुजराथी. नाशिकचा हा युवा बुद्धिबळपटू महाराष्ट्राचा तिसरा आणि सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला आहे. सलग तीन वर्षे (२००५, २००६, २००७) राष्ट्रीय विजेता तसेच सब-ज्युनियर १४ वर्षांखालील गटात जगज्जेता ठरलेला पहिला भारतीय बुद्धिबळपटू अशी अनेक वेळा विक्रमी कामगिरी करणाऱ्या विदित गुजराथीची ही उत्तुंग भरारी थक्क करणारी आहे. कारकिर्दीतील खडतर प्रवास तसेच त्याची उद्दिष्टे याबाबत विदित गुजराथीशी केलेली ही बातचीत-
वयाच्या १९व्या वर्षी तू ग्रँडमास्टर किताबाला गवसणी घातलीस, त्याबद्दल काय सांगशील?
ग्रँडमास्टर किताब पटकावण्याची माझी बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती. या प्रवासात अनेक अडथळ्यांची शर्यत मला पार करावी लागली. तब्बल १३वेळा मला ग्रँडमास्टर किताबाने हुलकावणी दिली. अखेर मी कठोर परिश्रम घेऊन, खेळात आमूलाग्र बदल घडवून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मी रोझ व्हॅली खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत मी ग्रँडमास्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. आता माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
सातव्या वर्षी तू बुद्धिबळ कारकिर्दीला सुरुवात केलीस, घरात बुद्धिबळासाठी पोषक वातावरण होते का? घरच्यांचा पाठिंबा कसा मिळायचा?
मला घरच्यांनी कायम पाठिंबा दिला आहे. लहानपणासूनच वडिलांनी मला चांगली साथ दिली आहे. बुद्धिबळ खेळात काय कारकीर्द घडवणार, त्यापेक्षा अन्य खेळ निवड, अशी टीका वारंवार माझ्यावर घरच्यांकडून किंवा नातेवाईकांकडून व्हायची, पण वडील माझ्या पाठीशी ठामपणे उभे असायचे. अनेक वेळा माझ्या पदरी निराशा पडायची.. मला पराभव पत्करावा लागायचा, त्या वेळी वडिलांनीच माझा आत्मविश्वास उंचावला आहे. पण आता माझ्या ग्रँडमास्टर किताबाने सर्वानाच आनंद झाला आहे. शाळेत असताना मी अनेक दिवस स्पर्धासाठी बाहेर असायचो. माझा बराच अभ्यास बुडायचा, पण शाळेतील सहकाऱ्यांनी किंवा शिक्षकांनी मला नेहमीच मदत केली आहे. मी बाबांसोबत मजा म्हणून बुद्धिबळ खेळायचो. ते व्यावसायिक बुद्धिबळपटू नसले तरी त्यांना हा खेळ कसा खेळला जातो, याची कल्पना होती. हळूहळू माझी आवड वाढत गेली, त्यानंतर मी नाशिक जिमखाना क्लबमध्ये दाखल झालो. तिथूनच माझ्या बुद्धिबळाची कारकीर्द सुरू झाली.
प्रवीण ठिपसे आणि अभिजित कुंटे यांच्यानंतरचा तू महाराष्ट्रातला तिसरा ग्रँडमास्टर. महाराष्ट्रात चांगल्या बुद्धिबळपटूंची कमतरता जाणवते का?
महाराष्ट्रात बुद्धिबळ हा खेळ फारसा गांभीर्याने किंवा व्यावसायिकपणे घेतला जात नाही. बरेच जण या खेळाकडे वळतात, पण अपयश आल्यानंतर अनेक जण हा खेळ सोडून देतात. या खेळात अपयशाचे प्रमाण अधिक असल्याने खेळाडूंचे खच्चीकरण होण्याची भीती अधिक असते. या खेळात जबरदस्तीने कारकीर्द घडवता येत नाही, पण बुद्धिबळाची आवड असल्यास, योग्य मार्गदर्शन आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करता येऊ शकते. म्हणूनच महाराष्ट्राला तिसरा ग्रँडमास्टर मिळण्यासाठी बरीच वर्षे प्रतीक्षा करावी लागली.
कोणत्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तुला लाभले आहे?
सध्या मी कझाकस्तानचे एव्हगेनी व्लादिमिरोव्ह यांच्याकडून मार्गदर्शनाचे धडे गिरवत आहे. वर्षभरापूर्वी मी ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्याकडूनही मार्गदर्शन घेत होतो. पण आता व्लादिमिरोव्ह यांच्या मार्गदर्शनाखाली माझी कामगिरी चांगली होत असल्यामुळे प्रशिक्षक बदलण्याचा माझा विचार नाही.
तुझी उद्दिष्टे काय आहेत?
परदेशातील स्पर्धामध्ये आणि तगडय़ा खेळाडूंविरुद्ध खेळण्याची माझी इच्छा आहे. त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यात होणारी जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा निर्धार मी बाळगला आहे. जगज्जेता बनणे आणि अव्वल क्रमांकावर पोहोचणे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. विश्वनाथन आनंदप्रमाणे मीसुद्धा बुद्धिबळातील जगज्जेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे, पण ते शिखर गाठण्यासाठी मला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पण ते पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे.

Story img Loader