दक्षिण आफ्रिकेचा महान फिरकीपटू इम्रान ताहिरने पाकिस्ताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता न आल्याने खंत व्यक्त केली आहे. याबाबत त्याने निराशा देखील व्यक्त केली. इम्रान ताहिर म्हणाला की, तो पाकिस्तानमध्ये प्रत्येक स्तरावर खेळला, पण हिरव्या जर्सीमध्ये तो खेळू शकला नाही. तसेच त्याला या गोष्टीचा खेद वाटतो.

वास्तविक इम्रान ताहिरचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला असून तो तेथे अनेक देशांतर्गत सामने खेळला आहे. इम्रान ताहिर हा त्यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा होता. त्यामुळेच त्याला लहानपणापासूनच कामाला सुरुवात करावी लागली. मात्र, एका चाचणी दरम्यान त्याची पाकिस्तान अंडर-१९ संघात निवड झाले आणि त्याचे आयुष्य बदलले.

तो पाकिस्तानातच प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला पण पाकिस्तानच्या वरिष्ठ संघाकडून खेळू शकला नाही. त्यामुळे इम्रान ताहिर पाकिस्तानातून प्रथम यूके आणि नंतर दक्षिण आफ्रिकेत गेला. त्याठिकाणी त्याने आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण केले.

पाकिस्तानकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही – इम्रान ताहिर

पाकिस्तानकडून खेळू शकलो नाही याची खंत इम्रान ताहिरला अजूनही आहे. पाकिस्तान ज्युनियर लीगमध्ये मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. इम्रान ताहिरने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, ”माझ्या आयुष्यात मी कधीही माझा आत्मा गमावला नाही. मी दुकानात पॅकिंगचे कामही केले. मला कोणीही गोलंदाजीसाठी बोलावले नव्हते. चाचणी दरम्यान मला विचारण्यात आले होते की, मला कोणी पाठवले. मी पाकिस्तानमध्ये प्रत्येक स्तरावर खेळलो पण हिरव्या जर्सीमध्ये खेळण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले नाही.”

हेही वाचा – T20 World Cup 2022 : ग्रीनचा समावेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने घेतली मोठी रिस्क, ‘या’ खेळाडूला करावी लागू शकते विकेटकीपिंग

इम्रान ताहिर पुढे म्हणाला, ”मी दक्षिण आफ्रिकेचा आभारी आहे ज्यानी मला क्रिकेट खेळण्याची संधी दिली. मी संधी शोधत होतो आणि त्यांनी मला ती संधी दिली. मी क्रिकेटपटूंना एकच सल्ला देईन की कधीही धीर सोडू नका आणि संधीच्या शोधात रहा. मी जगासमोर एक उदाहरण आहे आणि गेली २२ वर्षे क्रिकेट खेळत आहे.”