आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदासह २०१४च्या हॉकी विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळवण्याचे भारताचे स्वप्न भंगले आहे. आशिया चषकाच्या अंतिम लढतीत दक्षिण कोरियाने भारताच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरले. विश्वचषकात प्रवेश मिळवण्यासाठी आता भारताला नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आशियाना अजिंक्यपद स्पर्धेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, भारताच्या पराभवामुळे मलेशियाला विश्वचषकात थेट प्रवेश मिळणार आहे. सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना ३-३ अशी बरोबरी होती, मात्र दक्षिण कोरियाच्या कांग मून क्विऑनने निर्णायक गोल करत संघाच्या विजयावर ४-३ असे शिक्कामोर्तब केले.
बलाढय़ दक्षिण कोरियाने सुरुवातीपासूनच आक्रमणाला सुरुवात केली. २८व्या मिनिटाला जँग जाँग ह्य़ुनने पेनल्टी कॉर्नरच्या आधारे गोल केला. जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या जँगचा हा स्पर्धेतला आठवा गोल. यु ह्य़ुओ सिकने पुढच्याच मिनिटाला भारतीय बचावपटूंना भेदत आणखी एक गोल केला. मध्यंतरापर्यंत दक्षिण कोरियाच्या आघाडीपटूंना रोखत भारताने झंझावात रोखण्यात यश मिळवले, पण तरीही त्यावेळी भारत ०-२ अशा पिछाडीवर होता. मध्यंतरानंतर भारतातर्फे रुपिंदरपाल सिंगने शानदार गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत निकिआ थिमिय्याहने रिव्हर्स फ्लिकद्वारे अफलातून गोल करत भारताला बरोबरी करून दिली. मात्र भारताचा बरोबरीचा आनंद फार काळ टिकला नाही. नॅम ह्य़ुन वूने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत दक्षिण कोरियाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपायला पाच मिनिटे असताना मनदीप सिंगने सुरेख गोल करत भारताला ३-३ अशी बरोबरी करून दिली. उर्वरित मिनिटांमध्ये दक्षिण कोरियाच्या आक्रमणाला थोपवण्याची जबाबदारी भारतीय बचावपटूंवर होती. मात्र कांग मून क्विऑनने निर्णायक गोल करत दक्षिण कोरियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. या गोलसह दक्षिण कोरियाने आशिया चषकाच्या जेतेपदावरही कब्जा केला.
दक्षिण कोरिया भारत
२८ जँग जाँग ह्य़ुन ४८ रुपिंदरपाल सिंग
२९ यु ह्य़ो सिक ५५ निक्किन थिमय्याह
५७ नॅम ह्यून वू ६५ मनदीप सिंग ६८ कांग मून क्विऑन