पंच पुनर्आढावा प्रकिया म्हणजेच यूडीआरएसची क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चा असते. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या देशांनी जरी ‘डीआरएस’चा स्वीकार केला असला तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) त्याला असलेला विरोध अजून मावळलेला नाही. परंतु भारताच्या कोणत्याही कसोटी मालिकेत वादग्रस्त निर्णयाचा फटका बसल्यावर भारताच्या भूमिकेवर टीका होते. भारतीय हौशी कबड्डी महासंघाने मात्र भारतीय क्रिकेटपेक्षा एक पाऊल पुढे टाकण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळेच बंगळुरूला होणाऱ्या प्रो-कबड्डीच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये डीआरएस पद्धतीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मुंबईत २६ जुलैपासून प्रारंभ झालेल्या प्रो-कबड्डी लीगची सांगता बंगळुरूत होणार आहे. २९ ऑगस्टला दोन उपान्त्य फेरीचे सामने रंगणार आहेत, तर तिसऱ्या फेरीचा सामना आणि अंतिम सामना ३१ ऑगस्टला होणार आहे. या सामन्यांसाठी डीआरएसचा वापर करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला दोनदा पंचांच्या निर्णयाबाबत दाद मागण्याची मुभा असेल.
कबड्डीमध्ये पंचांच्या निर्णयावरून होणारे वाद हे परवलीचेच. क्रीडारसिकांसमोर होणारे हमरीतुमरीचे नाटय़ मग सर्वाचेच करमणूक करते. प्रो-कबड्डी लीगच्या निमित्ताने सर्व कबड्डीपटूंनी व्यावसायिक शिस्त जोपासली आहे. त्यामुळे स्थानिक स्पर्धामध्ये दिसणारे नाटय़मय कलगीतुरे येथे दिसत नाहीत. परंतु बाद फेरीच्या सामन्यांसाठी संघांना पंचांच्या निर्णयाला दाद मागता येणार आहे.
‘‘प्रो-कबड्डीच्या सर्वच सामन्यांसाठी डीआरएस लागू करण्याबाबत आम्ही विचार करीत होतो. परंतु वेळेचे गणित हे आमच्यापुढील प्रमुख आव्हान होते. सामन्यामधील झटापटींच्या क्षणांचे रिप्ले दाखवण्यासाठी किती वेळ देता येईल, हे सारे समीकरण साखळीमध्ये पडताळता येईल. मगच बाद फेरीत डीआरएस वापरता येईल, असे आम्ही ठरवले होते. आता बाद फेरीत डीआरएसचा वापर करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या तांत्रिक समितीचे प्रमुख ई. प्रसाद राव यांनी दिली.

Story img Loader