इंग्लंडचा भारतीय वंशाचा फिरकीपटू माँटी पानेसर याने मद्यपान करून गैरवर्तन केल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इंग्लंड कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदार असणाऱ्या माँटीची या प्रकरणामुळे चांगलीच नाचक्की होणार आहे. ब्रायटनमधील एका नाइटक्लबमध्ये माँटीने मद्यपान करून सुरक्षारक्षकावर मूत्रविसर्जन केले. या आक्षेपार्ह वर्तनासाठी त्याला ब्रायटन पोलिसांनी दंड ठोठावला आहे.
सोमवारी पहाटे चार वाजता हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी अनिर्णित राखत इंग्लंडने अ‍ॅशेस मालिकेत २-० अशी आघाडी कायम राखली. या सामन्यासाठी इंग्लंडच्या १४ सदस्यीय संघात माँटीचा समावेश करण्यात आला होता, मात्र अंतिम अकरा जणांमध्ये त्याला स्थान मिळाले नव्हते.
३१ वर्षीय पानेसर इंग्लंडच्या विजयानंतर ब्रायटनमधील बीचफ्रंट परिसरातील शूश क्लबमध्ये गेला होता. या ठिकाणी काही महिलांनी माँटी गैरवर्तन करत असल्याची तक्रार केली. त्यावेळी पानेसरला तिथून जाण्यास सांगण्यात आले. मात्र मद्याच्या नशेत धुंद असलेला पानेसर वरच्या मजल्यावर गेला आणि तिथून त्याने सुरक्षारक्षकांच्या अंगावर मूत्रविसर्जन केले. यानंतर पळून जात असलेल्या पानेसरला सुरक्षारक्षकांनी पकडून क्लबमध्ये आणले. पोलिसांना या प्रकरणाची कल्पना देण्यात आली. ससेक्स पोलिसांनी पानेसरला ९० पौंडाचा दंड ठोठावला आहे.
दरम्यान, पानेसरने आपल्या गैरवर्तनासाठी सपशेल माफी मागितली आहे. याप्रकरणी ससेक्स काऊंटी क्रिकेट क्लबने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. माँटीने ४८ सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले असून त्याच्या नावावर १६४ बळी जमा आहेत. चौथ्या अ‍ॅशेस कसोटीसाठी पानेसरला इंग्लंड संघातून वगळण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीच मैदानावरील आळसावलेल्या हालचालींसाठी माँटीला ससेक्स संघाने संघातून डच्चू दिला होता. २०११मध्ये पबच्या पार्किंग क्षेत्रात गाडीमध्ये आपल्या पत्नीशी हुज्जत घातल्याप्रकरणी माँटीला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यावेळी त्याला सोडून देण्यात आले होते.