गेल्यावर्षी अर्धवट राहिलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. मुख्य सामन्यापूर्वी लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबच्या अपटॉनस्टील काउंटी मैदानावर एक सराव सामना होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. अशातच, विद्यमान कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामुळे संपूर्ण भारतीय संघाला बोलणी खावी लागली आहेत.
तीन दिवसांपूर्वी रोहित आणि विराटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ‘क्रिकेटमॅन२’ या ट्विटर अकाउंटवर विराट कोहली आणि रोहित शर्माचे दोन फोटो पोस्ट करण्यात आले होते. या फोटोमध्ये दोघांच्याही हातात खरेदीच्या पिशव्या दिसत होत्या. रोहित आणि विराटने लंडनमध्ये एकत्र खरेदी सुरू केल्याचे या फोटोंवरून स्पष्ट दिसत होते. यादरम्यान त्यांनी काही चाहत्यांसोबत फोटोही काढले होते. विशेष म्हणजे दोघांच्याही तोंडाला मास्क लावलेले नव्हते. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोहली आणि शर्मासोबतच संपूर्ण संघाला फटकाल्याचे वृत्त आहे.
सध्या इंग्लंडमध्ये कोविड-१९ची स्थिती फारशी वाईट नाही. परंतु, बीसीसीआय गेल्या वर्षीच्या चुकांची पुनरावृत्ती करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळेच बीसीसीआयने विनामास्क फिरण्यास आणि चाहत्यांना भेटण्यास खेळाडूंना बंदी घातली आहे.
हेही वाचा – Video : विराट कोहली पुन्हा कर्णधाराच्या भुमिकेत? सराव सत्रात दिले आवेशपूर्ण भाषण
बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी इनसाइडस्पोर्टला सांगितले की, ‘यूकेमध्ये कोविडचा धोका कमी झाला आहे. परंतु, तरीही खेळाडूंनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. आम्ही संघाला अधिक काळजी घेण्यास सांगू.’
हेही वाचा – मायकल वॉन आणि वसीम जाफरमध्ये पुन्हा जुंपली! फोटोमुळे सुरू झाले ट्विटर युद्ध
गेल्यावर्षी जेव्हा भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता, तेव्हा संघातील काही खेळाडू एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. नंतर त्यांना करोनाचा लागण झाली होती. याशिवाय संघाच्या फिजिओलाही केरोना झाला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. परिणामी भारतीय संघाला पाच सामन्यांची कसोटी मालिका अर्धवट सोडून माघारी यावे लागले होते.