कोइम्बतूर : देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील प्रतिष्ठेच्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत बलाढय़ पश्चिम विभागासमोर दक्षिण विभागाचे तगडे आव्हान असेल. हा सामना बुधवारपासून येथील एसएनआर कॉलेजच्या मैदानावर सुरू होत आहे.
पश्चिम विभाग दोन सामने खेळून अंतिम फेरीपर्यंत येऊन पोहोचला आहे. तुलनेत दक्षिण विभागाला एकच सामना उत्तर विभागाविरुद्ध खेळायला मिळाला. दोन्ही संघाच्या ताकदीवर नजर टाकली, तर फलंदाजी हाच एक समान धागा समोर येतो.
पश्चिम विभागाने दोन्ही सामन्यांत फलंदाजीच्या ताकदीवर बाजी मारली. पृथ्वी शॉ हा पश्चिमेचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला असून, त्याने दोन सामन्यांत तीन डावांत ३१५ धावा केल्या आहेत. पश्चिम विभागाची ताकद फलंदाजीत असली, तरी उपांत्य फेरीत मध्य विभागाविरुद्ध शम्स मुलानीची फिरकी तितकीच महत्त्वाची ठरली होती, हे विसरून चालणार नाही.
दक्षिण विभागाने एकमेव सामना खेळताना उपांत्य फेरीत उत्तर विभागाविरुद्ध फलंदाजीचा कसून सराव करून घेतला. पहिल्याच डावात त्यांनी सहाशेहून अधिक धावांचा डोंगर उभा करताना पहिल्या डावातील अधिक्य निश्चित केले होते. उत्तर विभागाला गुंडाळल्यावर त्यांना फॉलोऑन न देता फलंदाजीचा सराव करत दुसऱ्या डावातही तीनशेहून अधिक धावांची मजल मारली. दक्षिण विभागाकडून रोहन कुन्नुम्मल, कर्णधार हनुमा विहारी, रिकी भुई, रवी तेजा यांनी शतके झळकावली.
हा तुलनात्मक आढावा बघितल्यानंतरही सामना पृथ्वी शॉ-आर. साई किशोर आणि हनुमा विहारी-अजिंक्य रहाणे असा रंगेल.