Aakash Chopra upset with Rishabh Pant not being captain in Duleep Trophy 2024 : टीम इंडिया सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेकवर आहे. मात्र आता भारतीय संघातील खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेसाठी चार संघही जाहीर करण्यात आले आहेत. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही २०२२ नंतर दुलीप ट्रॉफीमधून पुनरागमन करणार आहे. अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली पंतला इंडिया-बी टीममध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी, या स्पर्धेत पंतला कर्णधारपद न मिळाल्याने माजी भारतीय दिग्गज संतापला आहे.
‘पंत कर्णधार नाही, मला आश्चर्य वाटतंय’ –
आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये आकाश चोप्रा म्हणाला, “ऋषभ पंत कर्णधार नाही. त्याची अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्त्वाखालील संघात निवड झाली आहे. तो अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, जे अगदी ठीक आहे. मात्र, ऋषभ पंतही कसोटी कर्णधारपदाचा उमेदवार नाही का? मला थोडं आश्चर्य वाटतंय.” ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा कसोटीतील पंतची खेळी कोणीही विसरू शकत नाही. गाबा कसोटी टीम इंडियाला जिंकून देण्यात ऋषभने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
माजी क्रिकेटपटू पुढे म्हणाला, “मी वैयक्तिकरित्या या बाबतीत सहमत नाही कारण तुम्ही कसोटी क्रिकेटर म्हणून ऋषभ पंतचा सर्वोत्तम फॉर्म पाहिला आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत शतके झळकावणारा तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव यष्टिरक्षक आहे. शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि अगदी अभिमन्यू ईश्वरन देखील कर्णधार आहेत, पण पंत कर्णधार नाही आणि माझ्या मते ही मोठी गोष्ट आहे.”
स्पर्धेत ६ सामने खेळवले जाणार आहेत –
दुलीप ट्रॉफी २०२४ या स्पर्धा ५ ते १९ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार. ज्यासाठी चार संघांची निवड करण्यात आली आहे. शुबमन गिलला टीम-एचा कर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय टीम-बीची धुरा अभिमन्यू ईश्वरनच्या हाती आहे. टीम-सीचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे आणि टीम-डीचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे. स्पर्धेदरम्यान या सर्व संघांमध्ये ६ सामने खेळवले जाणार आहेत.