Duleep Trophy 2024 Akashdeep Statement on Mohammed Shami: भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीपने सध्या सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. भारत अ संघाकडून खेळताना त्याने संपूर्ण सामन्यात ९ विकेट घेतले. भारत अ विरूद्ध भारत ब संघाच्या सामन्यात आकाशदीपच्या भेदक गोलंदाजीने सर्वांनाच चकित केले. दुलीप ट्रॉफी २०२४च्या पहिल्या सामन्यात आकाशने ९ विकेट घेतल्या. भलेही संघ विजयी होऊ शकला नाही, पण त्याला भारतीय संघात संधी मिळाली आहे. आकाशने आपल्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय सिनियर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दिले आहे. शमीचा सल्ला ऐकल्याने त्याला दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली, असे त्याने सांगितले.
हेही वाचा – Ganesh Chaturthi: बांगलादेशच्या खेळाडूने गणेश चतुर्थीनिमित्त केली बाप्पाची प्रतिष्ठापना, फोटो केले शेअर
दुलीप ट्रॉफीमध्ये आकाशदीपने पहिल्या डावात ४ विकेट्स घेतले तर दुसऱ्या डावात त्याने ५ विकेट्स घेतले. अशारितीने संपूर्ण सामन्यात त्याने ९ विकेट्स घेत आपल्या कामगिरीचा डंका वाजवला. सामन्यानंतर त्याने उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय मोहम्मद शमीला दिले. तो म्हणाला, “मी शमीकडून इनपुट घेतो, कारण आमची बॉलिंग ॲक्शन खूप सारखीच आहे. मी त्याला विचारले की डाव्या हाताच्या फलंदाजाला राऊंड द विकेट गोलंदाजी करताना चेंडू कसा बाहेरच्या बाजूने काढायचा. शमीने मला सांगितले की जबरदस्ती अशी गोलंदाजी करायचा प्रयत्न करू नकोस, कारण ते आपणहून नैसर्गिकरित्या होईल.”
9 विकेट्स घेतलेल्यापैकी कोणते विकेट आकाशचे सर्वात आवडते विकेट होते, हे सांगताना आकाशदीप म्हणाला, “मी नितीश रेड्डीला [पहिल्या डावात] आणि वॉशिंग्टन सुंदरला [दुसऱ्या डावात] टाकलेले चेंडू. मी नेटमध्ये सराव करताना वॉशिंग्टनला अनेकदा गोलंदाजी केली आहे, ज्यामध्ये मी राऊंड द विकेट चेंडू टाकले आहेत. त्याने माझ्या गोलंदाजीविरूद्ध अनेकदा फलंदाजी केली आहे. त्याला माझ्या या गोलंदाजीची सवय होती, त्यामुळे मला असं काहीतरी करायचं होते जे मी आधी केलं नव्हतं.”
हेही वाचा – बाबर आझमला भेटायला आला चाहता, हारिस रौफने पाहिलं आणि…. VIDEO व्हायरल
“जेव्हा डाव्या हाताच्या फलंदाजाला अराऊंड द विकेट चेंडू टाकतो तेव्हा तो चेंडू नैसर्गिकरित्या शाईन असलेल्या दिशेने फिरतो. मी शमीला विचारलं होतं की अशावेळेस चेंडू त्याच्या आधीच्या अँगलमध्ये परत कसा आणायचा, कारण मी शमीला अशी गोलंदाजी करताना पाहिले आहे.”
“त्याने मला यावर तू जास्त लक्ष केंद्रित करू नये असा सल्ला दिला. तो म्हणाला की ते आपोआप होईल आणि जेव्हा तो चेंडू पूर्वीच्या अँगलला येईल तेव्हा तो विकेट घेणारा चेंडू बनेल. शमी आणि आकाशदीप त्यांचे देशांतर्गत क्रिकेट बंगालसाठी खेळतात.
आकाशदीपने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय कसोटी संघात स्थान मिळवले. बांगलादेशविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. वर्षाच्या सुरुवातीला खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही आकाशला संधी मिळाली होती. पहिल्याच सामन्यात त्याने ३ विकेट घेतले होते. आता पुन्हा एकदा संघ व्यवस्थापनाने त्याला संधी दिली आहे. बांगलादेशविरुद्ध जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसोबत आकाश गोलंदाजी करताना दिसणार आहे.