Duleep Trophy 2024 IND C Beat India D by 4 Wickets : आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे खेळल्या गेलेल्या दुलीप ट्रॉफी सामन्यात इंडिया-सी संघाने इंडिया-डी संघाचा ४ गडी राखून पराभव केला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंडिया सी संघाने ६ गडी गमावून २३३ धावांचे लक्ष्य गाठले. इंडिया-सीसाठी ऋतुराज गायकवाडने दुसऱ्या डावात ४६ धावा केल्या, ज्यामुळे संघाच्या विजयात मदत झाली. त्यांच्याशिवाय आर्यन जुयाल (४७) आणि रजत पाटीदार (४४) यांनी धावांचे योगदान दिले.
एकवेळ असे वाटत होते की कदाचित इंडिया-सी संघ संकटात सापडेल. पण, अभिषेक पोरेल आणि मानव सुथार यांनी हुशारीने फलंदाजी केली. पोरेलने नाबाद ३५ आणि सुथारने १९ धावांची खेळी करत इंडिया-सी संघाला विजय मिळवून दिला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात मानव सुथारनेही शानदार गोलंदाजी करत ४९ धावांत ७ बळी घेतले. त्याने पहिल्या डावात एक विकेटही घेतली. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
मानव सुथार ठरला सामनावीर –
इंडिया सी विरुद्ध इंडिया डी सामन्यात फिरकीपटू मानव सुथार चर्चेचा विषय राहिला. त्याने शानदार गोलंदाजी करत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली इंडिया डी संघाचा पराभव करण्यात महत्वाची भूमिका बजावली. सुथारने दुसऱ्या डावात १९.१ षटके टाकली आणि ७ विकेट्स घेतल्या. या काळात त्याने सात मेडन षटकेही टाकली. अशा प्रकारे त्याने शनिवारी इंडिया डी संघाला २३६ धावांवर गारद करण्यात मोलाची भूमिका बजावली. पहिल्या डावात इंडिया डी संघाने १६४ धावा आणि इंडिया सीने १६८ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये २२ वर्षीय सुथारने पहिल्या डावात एक विकेट घेतली.
हेही वाचा – Bhuvneshwar Kumar : यूपी T20 लीगमध्ये भुवनेश्वर कुमारचा कहर! दाखवून दिले इकॉनॉमी किंग का म्हणतात?
देवदत्त पडिक्कल (५६), रिकी भुई (४४), अक्षर पटेल (२८) आणि केएल भरत (१६) या खेळाडूंना सुथारने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये जन्मलेल्या सुथारच्या वडिलांची इच्छा होती की त्याने फलंदाज व्हावे. तथापि, सुथारने आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध काम केले, ज्यामध्ये प्रशिक्षक धीरच यांनी त्याला निर्णायक सल्ला दिला. खुद्द सुथार यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना याचा खुलासा केला. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.